नाशिक : अवैध बायोडिझेल निर्मितीच्या साठ्यावर छापा | पुढारी

नाशिक : अवैध बायोडिझेल निर्मितीच्या साठ्यावर छापा

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील जानोरी एमआयडीसीमध्ये अवैधपणे सुरू असलेल्या एका बायोडिझेल निर्मिती अड्ड्यावर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून केलेल्या कारवाईत एक कोटी एक लाख रुपयांचा अवैध डिझेल सदृश्य (ज्वलनशील पेट्रोलियम) पदार्थाचासाठा जप्त केला आहे.

नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सध्या जिल्हाभर अवैध धंद्याविरोधात शोध मोहीम हाती घेतली असून दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारातील एमआयडीसीमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये बायोडिझेलचा अवैध साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत पाटील यांनी पथकासह जाऊन येथील कान्हा इंटरप्राईजेस गट क्रमांक 599 /3 प्लॉट नंबर 16 ममधील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला असता येथे काही इसम अवैधरित्या डिझेल सदृश्य पदार्थांमध्ये एक ज्वलनशील पदार्थाची भेसळ करीत असताना आढळून आले. यावेळी पोलिसांनी संशयित अनिल राधाडिया (37, रा. सुरत, गुजरात, दीपक गुंजाळ (41, रा. प्लॉट नंबर, कोणार्क नगर, नाशिक, इलियास सज्जाद चौधरी (43, वाहन चालक रा. कुर्ला कलिना मेहबूब (मुळ उत्तर प्रदेश), अब्रार अली शेख (37, रा. शिवडी, मुंबई) अजहर इब्रार हुसेन अहमद (21, रा. प्रतापगड, उत्तर प्रदेश) या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्याकडे गिनॉल -1214/30 H C बल्क नावाचे केमिकल व मडसो- बी- 80 या नावाचे केमिकल विनापरवाना तसेच ते मिश्रण करून डिझेल सारख्या ज्वलनशील पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करताना आढळून आले. तसेच त्यांच्या ताब्यातून दोन टँकर क्र जीजे. 12 बीजे 8825 व एमए्च 43 बीजी 7967 या क्रमांकाचे दोन केमिकलने भरलेले टँकर व प्लॅस्टिक टाक्या भरलेले ज्वलनशील पदार्थ असा असा एक कोटी, एक लाख, 68 हजार 240 चाळीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांविरोधात दिंडोरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत पाटील, संदीप जगताप, दीपक अहिरे, गिरीश बागुल, विनोद टिळे यांच्या पथकाने केली. तर दिंडोरीचे पुरवठा निरीक्षक अक्षय लोहारकर, जानोरीचे तलाठी किरण भोये यांनी पंचनामा केला. अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कावळे, संदीप धुमाळ करीत आहेत.

संबंधित बातम्या

जानोरीत अवैध धंद्याचा तिसऱ्यांदा पर्दाफाश

जानोरी एमआयडीसीमध्ये अनेक कंपन्या व वेअर हाऊस असून त्यामध्ये यापूर्वी देखील बेकायदेशीर गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यामध्ये रेशनच्या अवैध गव्हाचा साठा जप्त करण्यात आला होता. तसेच या परिसरातील एका कंपनीत बोगस सॅनिटायझर निर्मितीचा कारखाना देखील आढळून आला होता. येथे अवैध इंधनाचा साठा सापडण्याची ही तिसरी घटना आहे.

हेही वाचा:

Back to top button