गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपकडून १६० उमेदवारांची घोषणा, हार्दिक पटेलसह क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या पत्नीला उमेदवारी | पुढारी

गुजरात विधानसभा निवडणूक : भाजपकडून १६० उमेदवारांची घोषणा, हार्दिक पटेलसह क्रिकेटर रविंद्र जडेजाच्या पत्नीला उमेदवारी

नवी दिल्ली, १० नोव्हेंबर, पुढारी वृत्तसेवा, : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीने गुरूवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. १८२ विधानसभा मतदार संघापैकी १६० विधानसभा मतदार संघातील उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहे. विद्यमान मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे घाटलोढिया मतदार संघातून निवडणूक लढवतील. कॉंग्रेसच्या एमी यागनिक त्यांच्याविरोधात निवडणूक रिंगणात आहेत. तर, पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल विरमगाम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील. माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या जागी डॉ.दर्शिता शाह यांना राजकोट (पश्चिम) मतदार संघातून भाजपने यंदा निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

मोरबीचे विद्यमान भाजप आमदार बृजेश यांचे तिकिट पक्षाने कापले आहे. त्यांच्या जागी माजी आमदार कांतिलाल अमृतिया निवडणूक लढवतील. मोरबी पूल दुर्घटनेत कांतिलाल यांनी लोकांचे जीव वाचवण्यासाठी मच्छू नदीत उडी घेतली होती. विशेष म्हणजे किक्रेटर रवींद्र जडेजा यांची पत्नी रीवाबा यांना जामनगर (उत्तर) मधून भाजपने उमेदवारी दिली आहे.

तिकिट वाटपासंबंधी चर्चा करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची (सीईसी) बुधवारी बैठक पार पडली. जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजप अध्यक्ष जे.पी.नड्डा, राजनाथ सिंह उपस्थित होते. बैठकीत १८२ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपने ३८ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले आहे, तर ६९ आमदारांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

कॉंग्रेससोडून भाजपवासी झालेले हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर यांना देखील उमेदवारी देण्यात आली आहे. सीईसी बैठकीपूर्वीच गुजरात भाजप प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील, उपमुख्यमंत्री नितिन पटेल, माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी, माजी गृहराज्यमंत्री प्रदीप सिंह जडेजा, माजी न्याय व शिक्षण मंत्री भूपेंद्र सिंह चुडास्मा तसेच सौरभ पटेल,आरसी फलदू यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते.
हे ही वाचा :

Back to top button