

पुढारी ऑननाईन डेस्क : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. २० नेत्यांच्या या यादीमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया, सांसद संजय सिंह आणि राघव चढ्डा यांचेही नाव आहे. आपने या निवडणुकीसाठी दिल्लीतील नेत्यांसोबतच पंजाबमधील नेत्यांवरही विश्वास दाखवला आहे.
गुजरातची १५ वी विधानसभा निवडणूक जाहीर झाली आहे. १८२ जागांवर मतदान होणार आहे. दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात ८९ जागासाठी तर दुसऱ्या टप्प्यात ९३ जागांसाठी मतदान होणार आहे. ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहेत. या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने भाजपला थेट आव्हान दिले आहे. त्यामुळे गुजरातमध्ये भाजपची डोकेदुखी वाढली आहे. आपच्या एन्ट्रीने गुजरातची समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसून येत आहेत. केजरीवाल यांनी मोफत वीज, पाणी आणि शिक्षण यासारखी आश्वासने दिली आहेत.
आपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये दिल्लीसह पंजाबमधील अनेक नेत्यांचा समावेश आहे. पक्षाने दोन महिला नेत्यांचाही या यामध्ये समावेश केला आहे. स्टार प्रचारकांच्या यादीतील क्रिकेटर हरभजन सिंह यांच्यावरही गुजरातच्या प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. आपचे गुजरातमधील मुख्यमंत्री पदाचे उमेदवार इसुदान गढवी, पक्षाचे प्रदेश अध्यक्ष गोपाल इटालिया, मनोज सोरथिया, अल्पेश कथिरिया, युवराज जडेजा हे प्रचारकांच्या यादीत आहेत. पंजाब सरकारमधील दोन महिला मंत्री बलजिंदर कौर आणि अनमोल गगन मान या देखील गुजरातच्या प्रचार रणधुमाळीत उतरणार आहेत. जगमल वाला, राजू सोलंकी, प्रवीण राम, गौरी देसाई, माथुर बैदनिया, अजीत लोकिल, राकेश हीरापारा या नेत्यांची यादीत नावे आहेत.
हेही वाचा :