पीएम मोदींनी कौतुक केल्यानंतर सचिन पायलट यांची अशोक गहलोतांवर टीका | पुढारी

पीएम मोदींनी कौतुक केल्यानंतर सचिन पायलट यांची अशोक गहलोतांवर टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्यातील वाद सर्वश्रूत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर यामध्ये आणखी भर पडली. राजस्थानच्या बांसवाडा येथील ‘मानगढ गौरव गाथा’ कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले होते. यानंतर पंतप्रधान मोदींनीही अशोक गहलोत यांचे कौतुक केले. यावर काँग्रेस नेते सचिन पायलट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सचिन पायलट म्हणाले, “हा अतिशय मनोरंजक घटनाक्रम आहे. कारण पीएम मोदींनी अशाच प्रकारे गुलाम नबी आझाद यांचे कौतुक केले होते. पण त्यानंतर गुलाम नबी आझाद यांनी काय केले? हे सर्वश्रूत आहे. पीएम मोदींनी गहलोत यांचे कौतुक करणे ही काँग्रेस पक्षासाठी गंभीर गोष्ट आहे.” ‘मानगढ स्मारक’ला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देतील, अशी आशा पंतप्रधान मोदींकडून होती. मात्र त्यांनी केवळ राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता असल्याने हा दर्जा दिला नाही, असा टोलाही पायलट यांनी लगावला.

पंतप्रधान मोदी अशोक गहलोत यांचे कौतुक करताना काय म्हणाले?

मानगढ धाम येथे झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी अशोक गहलोत यांचे कौतुक केले होते. यावेळी मोदी म्हणाले, गहलोत आणि मी एकाच कार्यकाळात मुख्यमंत्रीपदी काम केले आहे. अशोक गहलोत हे तत्कालीन काळात सर्वांत जेष्ठ मुख्यमंत्री होते. २०२३ मध्ये राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. याच दरम्यान पंतप्रधान मोदींनी गहलोत यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी एकमेकांचे कौतुक केल्याने अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत.

हेही वाचलंत का?

 

Back to top button