Lieutenant Deepali Gawkar : बांव गावच्या दिपाली गावकरची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदाला गवसणी | पुढारी

Lieutenant Deepali Gawkar : बांव गावच्या दिपाली गावकरची भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदाला गवसणी

कुडाळ; काशिराम गायकवाड : बांव गावच्या दिपाली विजय गावकर हीने भारतीय सैन्य दलाच्या लेफ्टनंट पदाला गवसणी घातली आहे. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी यशस्वी ठरलेली ही मुलगी कुडाळ तालुक्यातील बांव गावाच्या शेतकरी कुटूंबातील आहे. शेतकरी कुटुंबातील या युवतीने जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर यशस्वी ठरली आहे. (Lieutenant Deepali Gawkar)

अतिशय खडतर प्रवास करून सैन्य दलात या युवतीने लेफ्टनंट पदापर्यंत गरूडझेप घेतली आहे. सामान्य कुटुंबातील ही युवती आता लेफ्टनंट दिपाली विजय गावकर म्हणून सैन्य दलात सेवा बजावणार आहे. देश सेवा करण्याची संधी प्राप्त झाल्याचा तिला मोठा अभिमान आहे. तिच्या या यशाने बांव गावासह कुडाळ तालुक्याचे नाव उज्ज्वल झाले आहे. लेफ्टनंट पदी निवड झाल्यानंतर प्रथमच ती चेन्नई येथून मंगळवारी रात्री आपल्या बांव गावी दाखल झाली. यावेळी तिचे कुडाळ रेल्वेस्टेशन, कविलकाटे, बांबुळी आणि बांव येथे ठिकठिकाणी ढोलताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत करून अभिनंदन करण्यात आले. (Lieutenant Deepali Gawkar)

आई वडिलांचे दिपालीच्या स्वप्नांना भक्कम बळ

बांव देऊळवाडी येथील प्रगतशील शेतकरी विजय गावकर यांची दिपाली ही कन्या आहे. गावकर दांपत्याने दिपालीचे शिक्षण पूर्ण केले. दिपालीने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण बांव येथे, नंतर कुडाळ ज्युनियर कॉलेज येथे उच्च माध्यमिक आणि संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे बीएससीआयटी मधून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन मुंबई विद्यापीठ अंतर्गत पूर्ण केले. तिला लहानपणापासूनच सैन्य दलात सेवा करण्याची आवड होती. त्यादृष्टीने तीने शिक्षणानंतर प्रयत्न सुरू केले. पालकांनीही तिच्या स्वप्नांना भक्कम बळ दिले आणि खर्‍या अर्थाने तिचे स्वप्न साकार झाले असून आईवडीलांसह बांव गावाचे नाव रोशन केले आहे. बांव सारख्या छोट्याश्या ग्रामीण भागात शिक्षण घेवुन दिपालीने सैन्य दलात लेफ्टनंट पदापर्यंत मारलेली भरारी निश्चितच आदर्शवत व प्रेरणादायी अशीच आहे.

ग्रॅज्युएशन नंतर ती आयटी सेक्टरमध्ये नोकरीला लागली. त्याच वेळी तिने पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू केले. या कालावधीत तिने अथक कष्ट घेवुन जॉब पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास आणि आर्मी अधिकारी पदासाठी लागणारा अभ्यास केला. गेली तीन ते चार वर्ष ती आर्मी ऑफिसर पदासाठी लागणारा अभ्यास अहोरात्र करीत होती. पोस्ट ग्रॅज्युएशन नंतर तिने शॉर्ट सर्व्हिस कमिशनर टेक्निकल इंस्टिट्यूट मधून तीने आर्मी ऑफीसरसाठी तिने अर्ज केला. त्यानंतर बेंगलोर येथे पाच दिवसांची मॅरेथॉन इंटरव्ह्यू दिली. त्यानंतर ऑगस्ट 2021 रोजी तिचे सिलेक्शन होऊन तिने संपूर्ण भारतातून तिसरी रँकिंग प्राप्त केली. मेरीट लिस्ट लागल्यानंतर चेन्नई येथे प्रशिक्षण घेण्यासाठी ती रूजू झाली. वर्षभराचे अतिशय खडतर असे प्रशिक्षण तीने यशस्वीपणे पूर्ण केले आणि तिची लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. तीला फिल्ड एरिया पोस्टींग मिळाली असून लवकरच ती सेवेत रुजू होणार आहे. या निवडीनंतर चेन्नई येथून मंगळवारी रात्री मत्स्यगंधा एक्सप्रेसने कुडाळ रेल्वेस्टेशन स्टेशन येथे दाखल झाली. यावेळी रेल्वेस्टेशन येथे नागरीकांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर कुडाळ नगराध्यक्षा सौ.आफरीन करोल यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने तिचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत अभिनंदन केले. यावेळी काँग्रेस अल्संख्यांक सेल तालुकाध्यक्ष तरबेज शेख, युवक काँग्रेसचे वैभव आजगांवकर आदींसह स्थानिक नागरीक उपस्थित होते. त्यानंतर कविलकाटे, आबा जळवी यांच्या निवासस्थानी, बांबुळी व नंतर बांव येथे ठिकठिकाणी तसेच तिच्या निवासस्थानी ग्रामस्थांनी ढोलताशांच्या गजरात तिचे जल्लोषात स्वागत करून अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी बांव सरपंच नागेश परब, उपसरपंच सुनील वेंगुर्लेकर, उद्योजक संतोष सामंत, बाळू सामंत, प्रमोद परब आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. तसेच तिच्या या दैदिप्यमान यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

ट्रेनिंग पुर्ण करून घरी यायचा आनंद हा वेगळाच होता, पण त्यातही सर्वजण गावातील लोक माझ्या स्वागतासाठी आलेली बघुन अजुन मन भरून आलं. माझी इंडियन आर्मी मध्ये जाण्याचे स्वप्न होते. मी माझे ग्रॅज्युएशन एसआरएम कॉलेज कुडाळ मध्ये बीएससी आयटी मधुन पुर्ण झाल्यानंतर टीसीएस कंपनीत आयटी सेक्ट्रर मध्ये जॉबला लागले तेथुन मी जॉब करता करता एमएससी आयटीचे शिक्षण मुंबई युनिव्हरसिटीमधुन पुर्ण केले. जॉब करता करता मी इंडियन आर्मीसाठी  अ‍ॅप्लाय केला. एसएसबी इंटव्हुसाठी माझे सिलेक्शन झाले. मेरिट लिस्ट आल्यावर ओटीए चेन्नई येथे ट्रेनिंगसाठी निवड होवुन ट्रेनिंगला गेले. देशाची सेवा करायची इच्छा मला इथपर्यंत घेवुन आली. मेहनत, जिद्द आणि चिकाटी यामुळे मला माझं आणि माझ्या कुटूंबाच स्वप्न जागायला मिळतयं. आणि युनिफॉर्म मधुन देशाची सेवा करायला मिळतेय. माझ्या या यशामागे माझे आई,बाबा, भाऊ,सर्व वडिलधारी माणसं, माझे शिक्षक आणि मित्र मंडळी यांचे अमुल्य योगदान आहे असे लेफ्टनंट दिपाली गावकर हिने सांगितले.

हेही वाचा

Back to top button