Weight & Fitness: केवळ अधिक खाण्यानेच नाही, तर ‘या’ कारणांमुळेही वाढते वजन | पुढारी

Weight & Fitness: केवळ अधिक खाण्यानेच नाही, तर 'या' कारणांमुळेही वाढते वजन

पुढारी ऑनलाईन : वजन वाढण्याची समस्या आज अनेकांमध्‍ये दिसून येते. अचानक वाढलेले वजन आणि लठ्ठपणामुळे अनेक लोक चिंताग्रस्त असतात. जीवनशैली आणि अनियमित खाण्यापिण्याच्या सवयीमुळेच वजन वाढते, असे अनेकांचा समज असतो; पण फक्त खाण्यानेच नाही इतर काही घटनांमुळेही वजन वाढू शकते, असे काही संशोधनातून सिद्ध झाले आहे. आज आपण वजन वाढीच्या काही कारणांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याकडे तुम्ही वेळीच लक्ष दिल्यास वजनवाढीच्या (Weight & Fitness) समस्येवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवता येणे शक्य आहे.

अनुवंशिकता

ज्या आईवडीलांचे वजन हे पूर्वीपासूनच जास्त असते, त्यांच्या मुलांचेही वजनही जास्तच असते. मुलांच्या अधिक वजन असण्याचा मोठा संबंध हा त्यांच्या अनुवंशिकतेशीही असू शकतो. त्यामुळे पालकांनी सुरूवातीपासूनच याविषयी सजग राहून आपल्या मुलांना चांगली जीवनशैली द्यावी. अनुवंशिकता बदलता येत नाही; पण जीवनशैलीत आरोग्यदायी बदल नक्कीच करता येऊ शकतात, जेणेकरून तुमच्या मुलांचे वजन नियंत्रणात (Weight & Fitness) ठेवता येईल.

आरामदायी जीवनशैली

ऑफिसमध्ये जास्त वेळ बसून राहणे, सतत टीव्ही पाहणे, दिवसभर मोबाईल घेऊन बसणे यांसारख्या सवयी वजन वाढचे महत्त्वाचे कारण असू शकते. त्यामुळे तुम्हालाही अशाच काही सवयी असतील तर, लगेच या सवयी बदला. ऑफिसमध्ये बैठे किंवा इतर कोणतेही काम करताना मध्ये मध्ये ब्रेक घ्या. हलके व्यायाम करत राहा. मॉल, ऑफिसमध्ये शक्यतो लिफ्टऐवजी पायऱ्यांचाच वापर करा.

उच्च पातळीचा ताणतणाव

दैनंदिन धावपळाच्या जीवनशैलीत ताणतणावाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. जास्त ताण घेतल्यानेही वजन, लठ्ठपणा वाढतो. सतत तणावाखाली राहिल्याने आपल्या शरीरातून कोर्टिसोल(Cortisol) नावाचा हार्मोन बाहेर पडतो. कोर्टिसोल हे स्टिरॉइड संप्रेरकांपैकी एक आहे. ज्यामुळे शरीराच्या वाढीसाठी चालना मिळते. या हार्मोनचा वजनावरही विपरित परिणाम होतो.

हॉर्मोन्स पातळीमध्ये गडबड

स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेन आणि पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन नावाचे हार्मोन असते. या दोन्ही हार्मोन्सच्या गडबडीमुळे वजन वाढण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे हॉर्मोन्स पातळी नियंत्रित राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे. तसेच वेळोवेळी डॉक्टरांचा सल्ला घेणेही फायदेशीर ठरते.

पीसीओडाची (PCOD) ची समस्या

PCOD हा एक जीवनशैली विकार आहे. जो आजकाल अनेक स्त्रियांमध्ये प्रकर्षाने पहायला मिळतो. या समस्येमध्ये महिलांचे वजन झपाट्याने वाढू लागते. मासिक पाळी नियमित होत नाही, त्यामुळे अंग फुगल्यासारखे वाटते. तुम्हालाही ही समस्या असेल तर, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी सर्वात आधी तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करा. दुसरा निरोगी आहार घेण्यास सुरूवात करणे फायद्याचे ठरते.

हेही वाचा:

Back to top button