पुढारी ऑनलाईन डेस्क : जेवण दिवसाचे असो की रात्रीचे यानंतर सर्वांनाच विश्रांती घेण्यास आवडते. जेवल्यानंतर विश्रांती घेत फोनवर बोलणे हा तर काही नियमित कार्यक्रमच असतो. असे केल्याने वजन वाढण्याचा धोका असतो. तुम्हाला वजन कमी करायचे आहे का? (Weight Loss and Walking ) जेवल्यानंतर चालण्याचा विचार करा. कारण वजन कमी करण्यासह त्याचे अनेक आरोग्य फायदे आहेत! जाणून घेवूया या फायद्यांविषयी…
अमेरिकेतील व्हर्जिनियामधील ओल्ड डोमिनियन युनिव्हर्सिटीने जेवल्यानंतर चालल्याने शरीरात होणार्या बदलावर अभ्यास केला. यामध्ये असे आढळलं आहे की, जेवल्यानंतर तुम्ही संथ गतीने १५ ते २० मिनिटे चालल्यामुळे तुमच्या शरीरातील ग्लुकोजची पातळी कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी कॅलरी बर्न करणे आवश्यक असते. चालणे तुम्हाला कॅलरी बर्न करण्यासाठी मदत होते. चयापचय गती वाढते याचा अर्थ तुम्ही चरबीपासून जास्त कॅलरी जाळता. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते, असेही निरीक्षण या संशाेधनात नाेंदवले गेले.
जेवण दिवसाचे असो की रात्रीचे जेवल्यानंतर १५ ते २० मिनिटे चालणे हे वजन आटोक्यात ठेवण्यास मदत हाेते. चालल्यामुळे चयापचय क्रियेला चालना मिळते. जेवल्यानंतर चालल्यामुळे पचनसंस्थेला अन्नाचे ग्लुकोजमध्ये रुपांतर करण्यास मदत होते. जेवल्यानंतर चालल्याने तुमच्या प्रतिकार शक्तीमध्येही वाढ होते. जेवल्यानंतर विश्रांती घेतल्यापेक्षा काही मिनिटे चालल्याने प्रतिकार शक्तीमुळे शरीरातील टॉक्सिन बाहेर पडण्यास मदत होते. तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होण्याची शक्यता कमी होते, असेही संशोधनात नमूद करण्यात आले आहे.
जेवण घेतल्यानंतर शरीरातील रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे काही मिनिटे चालणे आवश्यक ठरते. जेवल्यानंतर तत्काळ विश्रांती घेतल्याने शरीराची हालचाल कमी होवून त्याचा परिणाम पचन शक्तीवर होतो. जेव्हा तुम्ही अन्न खाता तेव्हा तुमच्या रक्तातील साखर वाढते. जर ती जेवणानंतर खूप वाढली, तर ती सामान्य पातळीवर परत करणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे जेवल्यानंतर तत्काळ विश्रांती टाळा. जेवण दुपारचे असो की रात्रीचे जेवल्यानंतर तत्काळ झोपू नका. त्यामुळे अन्न पचन होण्याची प्रक्रिया मंदावते. अपचनाचा त्रास होतो. तसेच पोटविकारची समस्याही जाणवते. ज्यांना पोटविकार आहेत त्यांचा त्रास वाढतो. त्यामुळे जेवल्यानंतरची विश्रांतीही अनेक विकारांना निमंत्रण देणारी ठरते. तुम्ही जेवणानंतर चालत असाल तर तुमच्या रक्तातील साखर जास्त वाढणार नाही आणि तुम्हाला अधिक उत्साही वाटते.
हेही वाचा :