Nashik accident : मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर | पुढारी

Nashik accident : मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधानांकडून २ लाखांची मदत जाहीर

पुढारी ऑनलाईन : नाशिकमध्ये खासगी बस आणि ट्रेलरच्या अपघातात ११ जणांचा होरपळून मृत्यू आणि २१ जण गंभीर जखमी झाले. आज पहाटे नांदूर नाक्‍याजवळ हा भीषण अपघात झाला. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत नाशिक येथील बस दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या प्रत्येक नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून २ लाख आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

यावर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे की, या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्याप्रती माझ्या संवेदना आहेत. या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन या घटनेतील संबंधित घटकांना शक्य ती सर्व मदत करत आहे.

या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तीव्र दुःख व्यक्त केले आहे. यामध्ये मृत झालेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे. तसेच या अपघातातील जखमींचा सर्व खर्च सरकार करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे. या अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Back to top button