पर्यावरणाची स्वच्छता राखणार्‍या कावळ्याचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक! | पुढारी

पर्यावरणाची स्वच्छता राखणार्‍या कावळ्याचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यक!

आडेली : विवेक गोगटे :  अगो…हयतो वरते बघ… केवापासून आराडताहा…वायच हात उचलून बेगना जेवाण करा…त्याका जेवक नाय घातला तर…पित्रांका मोक्ष गावाचो नाय… कावळ्याची वाडी दाखयल्याशिवाय बोलयल्ली पितरा देखूल जेवची नाय…पटपटावन हात उकला नायतर फूडल्या वर्सातगत तो तरास देयत रवतलो… असे बोल सध्या सर्वत्र ऐकू येत आहेत.

पितृपक्षात कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे कावळ्याचा मान देण्यासाठी कुटुंबप्रमुख जातीनिशी लक्ष देताना दिसत आहेत. मात्र, मानवाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणामुळे कावळ्यासारख्या बहुतांश पक्ष्यांचा र्‍हास होत आहे. पक्ष्यांना वाचविण्याचे प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत जुन्या जाणत्या व्यक्तींकडून होत आहे. पितरांना मोक्ष मिळण्यासाठी पितृपक्षात त्यांच्या आवडीचे जेवण बनवून कावळ्यांना दाखवण्यात येते. कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्यास पितरांना मोक्ष मिळतो, अशी धारणा आहे. कावळ्याला दररोज अन्न दिल्याने पाप नष्ट होते व श्राद्धात कावळ्याला अन्न दिल्याने पितरांना तृप्ती मिळते व यमलोकी पितरांना त्रास होत नाही, असे मानले जाते.

कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व

एरवी अशुभ, अमंगल मानल्या जाणार्‍या कावळ्याला अगदी अगत्याने आपल्या पूर्वजांना आवडणारे विविध पदार्थ दिले जातात व पितृपक्षात सर्वत्र कावळ्याची चर्चा होत असते. कावळ्याचा जन्म वैवस्वत कुळात झाल्याचे मानले जाते.

…अन्यथा ‘दर्भाचा कावळा’ करावा लागेल,

लहानपणापासून आपल्याला पक्षी जगताची ओळख ‘एक घास काऊचा…’  इथपासूनच होते. आपण परिसरात सर्वत्र टाकलेले अन्न खरकटे यावर गुजराण करणारा कावळा पर्यावरणाची स्वच्छता राखत असतो. नेहमी त्याचे वस्तीस्थान पाण्याजवळच असते. भाद्रपद हा कावळ्यांचा विणीचा काळ असतो. आजही जुने जाणते शेतकरी कावळ्याचे घरटे किती उंचावर आहे, त्यावरून यंदा पाऊस किती असेल याचा अंदाज लावतात. मात्र, हाच कावळा आजकाल दुर्मीळ होत आहे. हवेतील प्रदूषण, सगळीकडे होणारा कीटकनाशकांचा वापर, जागोजागी उभारले जाणारे मोबाईल टॉवर, यामुळे कावळ्यासारख्या पक्ष्यांचा र्‍हास होत आहे. आपण सर्वांनी पर्यावरणाविषयी अजूनही आपली जबाबदारी ओळखली नाही तर भविष्यात कावळे नष्ट होऊन ‘दर्भाचा कावळा’ करावा लागेल, यात शंका नाही.

हेही वाचा :  

Back to top button