चाकरमान्यांना निर्बंधांतून सवलत नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे | पुढारी

चाकरमान्यांना निर्बंधांतून सवलत नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे

जालना; पुढारी वृत्तसेवा : कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना निर्बंधांतून सवलत नाही. चाकरमान्यांसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोरोनाचे निर्बंध लागू राहतील. त्यासाठी कोणतीही वेगळी सवलत दिली जाणार नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले.

चाकरमान्यांना निर्बंधांतून सवलत नाही

कोरोनाबाबतचे सर्व नियम हे टास्क फोर्सच्या चर्चेनंतर घेतले जातात. त्याचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना आहेत, आपत्ती व्यवस्थापनांतर्गत सर्व नियम केले जातात, असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाला कोकणात चाकरमान्यांनी जाण्यास हरकत नाही.

परंतु कोरोनाचे संकटही लक्षात घेतले पाहिजे. नागरिकांच्या हितासाठी नियम तयार केले आहेत, त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. याबाबत केंद्र सरकारने राज्यांना सतर्क राहण्यास सांगितले आहे.

केरळमध्ये कोरोनाबाधितांची अचानकपणे वाढलेल्या संख्येच्या आधारावर केंद्राने राज्यांना दिशानिर्देश दिले आहेत. याबाबत आपण केरळच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यांचा अहवाल आपणास प्राप्त झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

केरळात ओणमचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. त्यामुळे बाधितांची संख्या वाढल्याचा अंदाज आहे. याशिवाय केरळातील टेस्टिंगमध्ये वाढ झाली.

साधारणपणे 50 हजार टेस्टिंग होत असत. हे प्रमाण पावणेदोन लाखापर्यंत नेण्यात आले. त्यामुळे केरळची रुग्णसंख्या वाढली. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ या उक्तीप्रमाणे आगामी काळातील सण लक्षात घेऊन केंद्राने आम्हाला सावध राहण्यास सांगितले आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

Back to top button