गावठी पिस्तूलसह काडतूस जप्त; सोलापुरात दोघांना अटक | पुढारी

गावठी पिस्तूलसह काडतूस जप्त; सोलापुरात दोघांना अटक

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : येथील रेल्वे स्टेशनजवळ गावठी पिस्तूल घेऊन जाणार्‍या दोघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शनिवारी पहाटे सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, काडतूस व दोन मोबाईल असा 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. त्यानुसार एक गुन्हेगार व बांधकाम व्यावसायिक अशा दोघांना पोलिसांनी अटक केल्याचे पोलिस निरीक्षक संजय साळुंखे यांनी सांगितले.

सराईत गुन्हेगार विशाल यल्लप्पा गायकवाड (वय 25 रा.सेटलमेंट फ्रि कॉलनी नं.4) व बांधकाम व्यावसायीक महादेव शंकर चव्हाण (वय 29 रा. स्वामी विवेकानंद नगर, सैफुल) अशी दोघांची नावे आहेत.

शहर गुन्हेशाखेचे पोलिस अधिकारी व कर्मचारी शनिवारी (दि. 21) रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दोनजण रेल्वे स्टेशनकडे येणार असून, त्यांच्याकडे गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस असल्याची माहिती मिळाली. तेव्हा पोलिसांनी सातरस्ता ते रेल्वे स्टेशन व रेल्वे स्टेशन जवळील काडादी चाळीसमोर सापळा लावला. तेव्हा दोनजण फुटपाथवरून चालत येताना दिसले.

पोलिसांनी चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांची संशयावरून झडती घेतली. तेव्हा गायकवाड याच्या बरमोडाच्या कमरेजवळ एक गावठी पिस्तुल मिळून आले, तर बरमोडाच्या डाव्या खिश्यात एका प्लॅस्टिकच्या पिशवीत जिवंत काडतूस सापडले. त्यांच्याकडे लायसेन्स नव्हते. त्यामुळे त्यांना पिस्तुलासह अटक केली.

Back to top button