लव्हलिना हिचा सेमीफायनलमध्ये पराभव, कांस्यपदकावर समाधान | पुढारी

लव्हलिना हिचा सेमीफायनलमध्ये पराभव, कांस्यपदकावर समाधान

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो ऑलिम्पिकच्या सेमीफायनल सामन्यात भारताची बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन आज बुधवारी सकाळी विजयी निर्धाराने बॉक्सिंग रिंगमध्ये उतरली होती. पण लव्हलिना हिचा तुर्कीच्या बुसेनाज सुरमेनेली हिच्याकडून ०-५ असा पराभव झाला. लव्हलिना सेमीफायनलमध्ये हारली तरी तिने कांस्यपदक जिंकले आहे. यामुळे भारताच्या खात्यात तीन पदके जमा झाली आहेत.

२३ वर्षाची लव्हलिना आसामची आहे. तिने अखेरच्या १६ फेरीच्या सामन्यात तिच्यापेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या जर्मनीच्या नेडिन अपेटचा ३-२ असा पराभव केला होता. त्यानंतर तिने चायनीज तैपेईच्या खेळाडूचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली होती.

महिलांच्या ६९ किलो वजनी गटाच्या सेमीफायनलमध्ये तिने आक्रमक खेळ केला. पण तिला तुर्कीच्या सुरमेनेकडून पराभव स्वीकारावा लागला.

लव्हलिना ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणारी भारताची दुसरी भारतीय महिला बॉक्सर बनली आहे. याआधी मेरी कोमने लंडन ऑलिम्पिकमध्ये २०१२ मध्ये कांस्यपदक जिंकले होते.

पुरुषांमध्ये विजेंदर सिंगने २००८ च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

याआधी टोकियो ऑलिम्पिकमधून भारताची स्टार बॉक्सर एमसी मेरी कोमचा प्रवास संपुष्टात आला होता. प्री-क्वार्टर फायनलमध्ये तिला कोलंबियाच्या इंग्रिट वॅलेन्सियाकडून पराभव पत्करावा लागला. व्हॅलेन्सीयाने फ्लायवेटच्या ४८-५१ किलो वजनी गटात मेरीवर ३-२ अशी मात केली होती.

कुस्तीच्या आखाड्यात दंगल…

दरम्यान, ऑलिम्पिकमध्ये कुस्तीच्या आखाड्यात भारताचा कुस्तिपटू रवी कुमार दहिया याने विजयी सलामी दिली. रवी कुमार दहिया याने फ्रीस्टाइलच्या ५७ किलो वजनी गटात कोलंबियाच्या ऑस्कर टिग्रेरोस याला हरवले. यामुळे तो उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

नीरज चोप्राची अंतिम फेरीत धडक…

तर भालाफेक स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने अंतिम फेरीत धडक मारली आहे. आज बुधवारी (दि.०४) झालेल्या अ गटातील पात्रता फेरीत नीरजने जोरदार कामगिरी केली. यामुळे तो अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्याने केलेल्या कामगिरीनुसार ऑटोमॅटिक क्वालिफिकेशनच्या नियमांनुसार तो थेट अंतिम फेरीत पोहोचला आहे.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : तेजस्विनी सावंतची पुढारी साठी विशेष मुलाखत | Tokyo Olympic 2021

Back to top button