पुरुष हॉकी : कांस्य पदकासाठी भारत जर्मनीला भिडणार! | पुढारी

पुरुष हॉकी : कांस्य पदकासाठी भारत जर्मनीला भिडणार!

टोकियो; पुढारी ऑनलाईन : टोकियो २०२० च्या पुरुष हॉकी च्या दुसऱ्या उपांत्य फेरीचा निकाल समोर आला आहे. खरंतर हा निकाल भारतीय संघाला काही दिलासा देणारा आहे.

पूल सामन्यात भारताला पराभूत करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने जर्मनीला ३-१ गोलफरकाने पराभूत करत अंतिम फेरीत गाठली आहे.

त्यामुळे आता भारताला कांस्य पदकाच्या लढतीत ऑस्ट्रेलियाऐवजी रिओ ऑलिम्पिक-२०१६ च्या कांस्यपदक विजेत्या जर्मनीशी सामना करावा लागेल.

जर्मनीचा संघ देखील कमकुवत नाही, परंतु किमान त्यांच्याशी खेळताना भारताला त्यांच्या मनावर पूल सामन्याच्या पराभवाचे मानसिक दबाव असणार नाही. हीच काय ती दिलासा देणारी बाब आहे.

पण हॉकी हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कुठल्या क्षणी कुठला संघ टफ फाईट देईल आणि कुठला संघ सपशेल अपयशी ठरेल हे सांगणे अवघड आहे.

तरी टोकियो ऑलिम्पिक मधील भारतीय संघाचा खेळ पाहता देशवासीयांना आता त्यांच्याकडून ब्रांझ पदकाची अपेक्षा आहे. आता या अपेक्षांचं ओझं भारतीय संघाला पेलवेल का हे सामना समाप्तीची शिट्टी वाजत नाही तोपर्यंत तरी समजणार नाही.

२०१६ च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील रौप्य पदक विजेता आणि विश्वविजेता बेल्जियमचा सामना अंतिम सामन्यात होईल, पहिल्या उपांत्य सामन्यात भारताला ५-२ ने पराभूत केले.

दरम्यान, आज (दि. ३) ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनलमध्ये विश्वविजेता बेल्जियमकडून स्वीकारावा लागला आहे.

बेल्जियमने भारतावर ५-२ गोलने विजय मिळवला आहे. त्यामुळे ऑलिम्पिमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचं भारतीय संघाचं स्वप्न धुळीस मिळालं आहे.

मात्र, असं असलं तरीही भारतीय संघाला ब्राँझ पदक मिळवता येऊ शकतं. कारण सेमीफायनलमध्ये भारतीय संघाचा जरी पराभव झाला असला तरी ब्राँझ पदक जिंकण्याची आणखी एक संधी टीम इंडियाकडे असणार आहे. पण असं असलं तरी ब्राँझ पदकासाठी भारताला जर्मनी विरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे.

सेमीफायनलमध्ये बेल्जियम संघाने शेवटच्या हाफमध्ये निर्णायक गोलची आघाडी घेतली होती. दरम्यान, तीन हाफपर्यंत भारत आणि बेल्जियम २-२ गोल अशी बरोबरी होती. पण शेवटच्या हाफमध्ये बेल्जियमने जबरदस्त खेळ करत तब्बल तीन गोल करत अंतिम क्षणी विजय मिळवला.

सुरुवातीला भारतीय संघाने दोन गोल करुन बेल्जियमवर आघाडी घेतली होती. मात्र, बेल्जियमने जबरदस्त खेळ करत या सामन्यात पुनरागमन करत निर्णायक आघाडी घेतली होती. तर भारतीय संघाला त्यांनी गोल करण्याची संधीच दिली नाही.

२०१२ च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये पूल टप्प्यात बेल्जियमने भारतीय हॉकी संघाचा ३-० असा पराभव केला होता. तर २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये, उपांत्यपूर्व फेरीत भारताला ३-१ ने पराभूत व्हावे लागले होते. अशा परिस्थितीत भारताने फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र, बेल्जियमने पुन्हा एकदा त्यांना पराभूत केलं.

Back to top button