मीराबाई चानूचा जिगरबाज प्रवास; ‘रियो’चे अपयश ते टोकियोतील रुपेरी यश

Published on
Updated on

अपयशाने खचून न जाता पुन्हा तेवढ्याच जोमाने मेहनत करून यश मिळवणे हे सोपे नसते. भारताची मीराबाई चानू हे त्याचे ताजे उदाहरण आहे. 2016 रियो ऑलिंपिकमध्ये चानूने चांगली कामगिरी करण्यासाठी खूप प्रयत्न केले. तिच्या पदरी अपयश आले. पण, तिने हार न मानता टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक मिळवले. रियो ऑलिंपिकमध्ये तिला एकाही प्रयत्नात योग्य पद्धतीने वजन उचलता आले नव्हते. त्यामुळे तिला अपात्र घोषित करण्यात आले. या कामगिरीमुळे एक वेळ तिच्या मनात भारत्तोलन सोडण्याचा विचार देखील आला. पण, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी मीराने मेहनत करण्याचा निर्णय घेतला. तिच्या याच मेहनतीचे फळ तिला ऑलिंपिक पदकाच्या रूपाने मिळाले.

2017 जागतिक भारत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण

रियो ऑलिंपिकनंतर 2017 मध्ये मीराने 194 किलो वजन उचलत जागतिक भारत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले. 22 व्या वर्षी अशी कामगिरी करणारी चानू ही पहिली भारतीय अ‍ॅथलीट बनली. यासोबत तिने 2014 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 49 किलो वजनी गटात रौप्यपदक मिळवले होते. चानूने 2018 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी केली. 2018 मध्ये चानू पाठीच्या दुखापतीने त्रस्त होती. तिने या दुखापतीतून सावरत 2019 मध्ये थायलंड येथे झालेल्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये पुनरागमन करत चौथे स्थान मिळवले. त्यावेळी तिने 200 किलो हून अधिक वजन उचलले होते.

चानूने रचला जागतिक विक्रम

यावर्षी एप्रिलमध्ये झालेल्या आशियाई भारत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानूने स्नॅचमध्ये 86 किलो वजन उचलल्यानंतर क्लीन अँड जर्कमध्ये जागतिक विक्रमाची नोंद करत 119 किलो वजन उचलले. ती एकूण 205 किलो वजन उचलत तिसर्‍या स्थानी राहिली. यापूर्वी क्लीन अँड जर्कमध्ये जागतिक विक्रम हा 118 किलो होता. मीराबाई चानू ही मणिपूरच्या इम्फाळ येथे राहणारी आहे. तिने भारत्तोलन स्पर्धेत वयाच्या 11 व्या वर्षी पहिले सुवर्णपदक मिळवले. तिने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात ही जागतिक आणि ज्युनियर आशियाई चॅम्पियनशिपने केली. ती कुंजराणी देवीला आपला आदर्श मानते.

विजयानंतर मीरबाईला झाली आईची आठवण

माझ्यासाठी सर्व स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे. हे पदक मी आपल्या देशाला आणि येथील सर्व नागरिकांना अर्पण करते. त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. आपल्या कुटुंबीयांचे देखील मी आभार मानते. माझ्या आईने या प्रवासात मला साथ दिली. तिने माझ्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग केला. सरकारकडून मला चांगली मदत मिळाली. स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई), इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (आयओए) आणि भारतीय भारत्तोलन महासंघ यांनी मला पाठिंबा दिला. माझे प्रशिक्षक विजय शर्मा यांचे देखील मी आभार मानते. ज्यांनी माझ्याकडून मेहनत करून घेतली, त्याचे फळ मला पदकाच्या रूपात मिळाले, असे पदक जिंकल्यानंतर चानू म्हणाली.

ऑलिम्पिकमध्ये आज भारत : 25 जुलै

  • बॅडमिंटन : पुरुष एकेरी – बी साई प्रणित, महिला एकेरी – पी व्ही सिंधु, पुरुष दुहेरी – सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी
  • बॉक्सिंग : पुरुष गट – मनिष कौशिक, महिला गट – मेरी कोम.
  • जिम्नॅस्टिक : महिला आर्टिस्टिक – प्रणती नायक
  • हॉकी : पुरुष हॉकी सामना
  • रोविंग : पुरुष डबल स्कल्स – अर्जुन लाल व अरविंद सिंग
  • सेलिंग : महिला लेजर – नेत्रा कुमानन, पुरुष लेजर – विष्णु सरवनन
  • नेमबजी : महिला 10 मीटर एअर पिस्तूल : मनू भाकर व यशस्विनी देसवाल, पुरुष 10 मीटर एअर रायफल : दीपक कुमार व दिव्यांश सिंग पंवार, पुरुष स्किट : अंगद बाजवा व मैराज अहमद खान.
  • जलतरण : पुरुष 100 मीटर बॅकस्ट्रोक : श्रीहरी नटराज, महिला 100 मीटर बॅकस्ट्रोक : माना पटेल
  • टेबल टेनिस : मिश्र दुहेरी – अचंता शरथ कमल व मनिका बत्रा, पुरुष एकेरी – अचंता शरथ कमल, एस. गनसेकरन, महिला एकेरी – मनिका बत्रा, सुतिर्था मुखर्जी
  • टेनिस : महिला दुहेरी – सानिया मिर्झा व अंकिता रैना

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news