ईद विशेष : औरंगाबादमधील शाहनूरमियां दर्गाह येथे भरणारा उरूसचा बाजार लुप्त | पुढारी

ईद विशेष : औरंगाबादमधील शाहनूरमियां दर्गाह येथे भरणारा उरूसचा बाजार लुप्त

सूफी संत परंपरा जपणाऱ्या देशातील प्रमुख दर्गाहांमध्ये औरंगाबादच्या शाहनूरमियां दर्गाहचा समावेश होतो. सूफी संत परंपरेला उभारी देण्यासाठी पर्यटन क्षेत्रातील तज्ज्ञांनी पुढाकार घेतला तर या दरगाहचे गतवैभव उजळून निघेल. त्याचबरोबर हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ ठरू शकेल, असे मत सूफी पर्यटनाचे संकल्पक डॉ. राजेश रगडे यांनी व्यक्त केले आहे.

सूफी संत परंपरेला इस्लाम धर्मात महत्त्व आहे. याचा प्रभाव तुर्कस्तान, रशिया, युक्रेन आदी देशांत मोठ्या प्रमाणात आहे. ही परंपरा जपणाऱ्या प्रमुख दर्गाहांमध्ये अजमेरचा गरीब नवाज दर्गाह, त्यापाठोपाठ फत्तेपूर सिक्रीचा सलीम चिश्ती दर्गाह, दिल्ली येथील हजरत निजामोद्दीन दर्गाह, गुलबर्गा येथील ख़्वाजा बंदा नवाज दर्गाह आणि त्यापाठोपाठ पाचव्या क्रमांकावर औरंगाबादेतील शाहनूरमियां दर्गाह आहे.

सूफी संत शाहनूरमियां औरंगाबादेत १६६० मध्ये दाखल झाले. त्यांनी आल्याबरोबर मोती कारंजा येथे डेरा टाकला होता. याच ठिकाणी त्यांनी हुजरा (लोकांना राहण्यासाठी जागा) व खानका (शिक्षणाची सुविधा) बनवला. शाहनूरमियांचे निस्सीम भक्त मुघल साम्राज्याचे दख्खनचे दिवाण दीनायात खान यांनी कुतूबपुरा येथे मोठा खानका बनवला.

प्रभावी व्यक्तिमत्त्व

शाहनूरमियां यांचे व्यक्तिमत्त्व प्रभावी होते. त्या काळात विविध राज्यकर्ते त्यांचा सल्ला घेण्यासाठी औरंगाबादेत येत होते. याचबरोबर त्यांच्याकडे दैवी शक्ती आणि त्यांच्याकडे असलेल्या करामतींचा उल्लेख केला आहे. त्याचबरोबर त्यांनी कॉलराच्या साथीत अनेक नागरिकांचा जीव वाचवल्याचे, तसेच त्यांचा “हब्स ए दम’ – स्वतःच्या श्वासावर नियंत्रण करण्याच्या कलेत पारंगत, असा उल्लेख बहाउद्दीन हसन उरूज यांच्या ‘खिजा ऊं बहार’ या पुस्तकात आहे.

साधू संतांशी जिव्हाळ्याचे संबंध

संत शाहनूरमियां यांचे समकालीन साधू संतांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांची दौलताबाद येथील साधू मनपूर परसाद यांच्याशी मैत्री होती. याबाबत इनायत अल्लाखान औरंगाबादी यांनी उल्लेख केला आहे.

इजिप्तच्या तुलनेत उरूसचा बाजार

इजिप्तच्या बाजारात जगातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. याच तोडीचा बाजार शाहनूरमियांच्या निधनानंतर औरंगाबादेत उरूस काळात भरत होता. या ठिकाणीही जगातील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची रेलचेल असे. खाकसर सब्ज़वारी यांच्या लिखाणात हा उल्लेख आढळून येतो. आता हा बाजार लुप्त झाला आहे.

– जालिंदर देशकर, सुनील थोटे; औरंगाबाद

Back to top button