ऑपरेशन ‘रफाह’मुळे अमेरिका संतप्‍त, इस्रायलला हाेणारा शस्‍त्र पुरवठा थांबवला! | पुढारी

ऑपरेशन 'रफाह'मुळे अमेरिका संतप्‍त, इस्रायलला हाेणारा शस्‍त्र पुरवठा थांबवला!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आंतरराष्‍ट्रीय दबावाला न जुमानता इस्त्रायलच्‍या सैन्याने दक्षिण गाझा पट्टीतील रफाह शहरामध्ये लष्‍कर कारवाई सुरु केली आहे. मात्र या कारवाईवर अमेरिकेने संताप  व्‍यक्‍त केला आहे. ज्‍यो बायडेन सरकारने लाखो पॅलेस्टिनी आश्रय घेत असलेल्या रफाह शहरात इस्त्रायलने मोहीम राबवणे टाळावे, अशी इच्छा व्‍यक्‍त केली आहे. तसेच आता इस्रायलला घातक शस्त्रे आणि 1000 किलो वजनाच्या बॉम्बचा पुरवठा थांबवण्‍याचा निर्णयही घेतला असल्‍याचे वृत्त ‘रॉयटर्स’ने दिले आहे.

शक्तिशाली बॉम्बच्या वापराकडे अमेरिकेचे लक्ष

इस्‍त्रायलने हमासविरोधात कारवाई सूरु केली तेव्‍हाच गाझा शहरातील लाखो पॅलेस्‍टिनी नागरिकांनी रफाह शहरात आश्रय घेतला होता. आता गाझा पूर्णपणे उद्‍ध्‍वस्‍त झाल्‍यानंतर इस्‍त्रायलने रफाहवर हल्‍ला केला आहे. दरम्‍यान, आम्ही इस्रायलला दिलेल्या शस्त्रास्त्रांचा काळजीपूर्वक आढावा घेत आहोत. हे शस्‍त्रे आणि बॉम्‍बचा वापर रफाहमध्ये केला जावू शकतो. आम्ही गेल्या आठवड्यात इस्रायलला 1000 किलो वजनाच्या बॉम्बचा पुरवठा थांबवला आहे. या अत्यंत शक्तिशाली बॉम्बच्या वापरावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवून आहोत. शहरी भागात त्याच्या वापराचे भयंकर परिणाम होतात. भविष्यात शस्त्रास्त्रांची वाहतूक कशी करायची याबाबत आम्ही अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे ज्‍यो बायडेन प्रशासनातील वरिष्‍ठ अधिकार्‍याने स्‍पष्‍ट केल्‍याचे वृत्तसंस्‍था ‘रॉयटर्स’ने म्‍हटलं आहे.

 इस्‍त्रायला करण्‍यात येणारा शस्‍त्र पुरवठा लांबणीवर

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, अमेरिका इस्‍त्रायलला पुरविणार्‍या बॉम्‍बमध्‍ये बोईंग कंपनीने निर्मित संयुक्त डायरेक्ट अटॅक बॉम्ब आणि स्मॉल डायमीटर बॉम्बचाही समावेश होता. आता हा पुरवठा लांबणीवर टाकण्‍यात आला आहे. अमेरिकेचे सरकार इस्रायलवर रफाहवरील कारवाई संपविण्‍यासाठी दबाव आणत आहेत. तसेच रफाह शहरात असणारे सर्व पॅलेस्टिनी नागरिकांना इस्त्रायलने सर्वप्रथम सुरक्षित स्‍थळी जाण्‍यासाठी पावले उचलावीत जेणेकरून नागरिकांचे होणारे मृत्यू रोखता येईल, असेही अमेरिकने स्‍पष्‍ट केले आहे.

रफाह सीमेवर इस्‍त्रायलचा कब्‍जा

दरम्यान, इस्रायली लष्कराने मंगळवारी गाझा आणि रफाह शहराच्‍या सीमेवर कब्जा केला. इस्त्रायली टँक ब्रिगेडने मंगळवार, ७ मे रोजी गाझाच्या महत्त्वाच्या रफाह सीमेवर ताबा मिळवला. जवळच्या मित्रपक्षांच्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष करून इस्रायलने दक्षिणेकडील शहरात प्रवेश केला. केरेम शालोम, रफाह आणि गाझामधील इतर मुख्य मार्ग बंद केल्यामुळे पॅलेस्टिनींना मदतीचा ओघ कमी होऊ शकतो, असे संयुक्त राष्ट्राने म्‍हटले आहे.

गाझा युद्धात आतापर्यंत ३४ हजार पॅलेस्टिनी मारले गेले

इजिप्त आणि कतारने मांडलेला युद्धविराम प्रस्ताव हमासने सोमवारी स्वीकारला आहे, असे सांगताच इस्रायलचा रफाह शहरावर हल्‍ला केला. ७ मे रोजी इस्त्रायल -हमास युद्धाला सात महिने पूर्ण झाले आहेत. स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, युद्धात 34,700 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत आणि गाझा पट्टी उद्ध्वस्त झाली आहे.दरम्‍यान, ओलिसांच्या सुटकेच्या कराराचा एक भाग म्हणून हमासने सर्वसमावेशक युद्धविरामाचा प्रस्‍तावाचे संकेत दिले असतानाच इस्रायल सैन्‍य गाझा पट्टीतून माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी रविवार ५ मे रोजी स्‍पष्‍ट केले होते. त्‍यामुळे आता हमास आणि इस्‍त्रायल संघर्ष अधिक तीव्र होण्‍याची शक्‍यता आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button