नगर : पुढारी वृत्तसेवा : मान्सून कालावधीत पूर अथवा वादळामुळे नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते. या परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे. पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी निवार्यांचे नियोजन करा, असे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. आपत्ती काळात कोणीही मुख्यालय न सोडण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी सालीमठ यांनी यावेळी अधिकार्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी जिल्हाधिकारी सालीमठ यांनी मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे हे प्रत्यक्ष तर शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार दूरदृष्य प्रणाली द्वारे उपस्थित होते. जिल्ह्यात पूरपरिस्थिती उद्भवल्यास नागरिकांना स्थलांतरीत करण्यासाठी सुरक्षित निवार्याची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे निवार्यांची पहाणी करून त्याबाबत सुक्ष्म असे नियोजन करा. त्याचबरोबर त्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात अन्नधान्य, पाणी आदीची व्यवस्था देखील करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सालीमठ यांनी अधिकार्यांना दिले.
अपघातांच्या ठिकाणी बोर्ड, रिफ्लेक्टर लावावेत. अनेकवेळा पाऊस व वार्यामुळे झाडे रस्त्यांवर उन्मळून पडतात. ज्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशी झाडे तातडीने बाजूला करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी. अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महापालिका व नगरपालिका हद्दीमध्ये धोकादायक असलेल्या इमारतींची पाहणी करून त्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी. शहरांमध्ये ड्रेनेज चोकअपमुळे अनेकवेळा पाण्याचा निचरा
होत नाही.
ड्रेनेजची तातडीने दुरुस्ती करुन घेण्याच्या सुचनाही जिल्हाधिकार्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीस जलसंपदा, पशुसंवर्धन, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, पाणीपुरवठा, महानगरपालिका, विद्युत व जलसंधारण विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा