Laila Khan murder | फार्म हाऊस, भयानक कट अन् ६ हत्या, लैला खान हत्याकांड कशासाठी घडलं?

Laila Khan murder | फार्म हाऊस, भयानक कट अन् ६ हत्या, लैला खान हत्याकांड कशासाठी घडलं?

Published on

[author title="नरेंद्र राठोड, ठाणे" image="http://"][/author]

लालसा मनाची फार वाईट अवस्था आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिलोभ त्याच्या हातून नेहमीच कुकर्म घडवत असते. एका सावत्र पित्याच्या मनात देखील अशीच लालची वृत्ती जागृत झाली अन् त्याने आपली पत्नी शेलिना, अभिनेत्री लैला खानसह पाच सावत्र मुलांची हत्या केली. त्याने हे सारे कुकर्म संपत्तीच्या लालसेने केले होते. मात्र, त्याची ही लालसाच त्याला थेट फाशीच्या फंद्यापर्यंत घेऊन गेली.

ही कहाणी आहे 30 वर्षीय लैला खान आणि तिच्या सुखी संपन्न परिवाराची. लैला खान एका श्रीमंत परिवारात जन्मलेली मुलगी. तिला बॉलीवूडमध्ये अभिनेत्री होण्याची इच्छा होती. तिने आपल्या चिकाटीने बॉलीवूड मध्ये एन्ट्री देखील मिळवली. लैलाचा पहिला चित्रपट 2002 मध्ये रीलिज झाला होता अन् त्याचे नाव होते 'मेकअप'. त्यानंतर 2008 साली तिला थेट राजेश खन्ना सारख्या सुपरस्टारसोबत काम करण्याची संधी मिळाली.'वफा : ए डेडली लव स्टोरी' या हिंदी चित्रपटात राजेश खन्ना सोबत काम केल्यानंतर लैलाला खर्‍या अर्थाने बॉलीवूडमध्ये एक नवी ओळख मिळाली होती. त्यानंतर तर तिच्या हातात आणखी काही चित्रपट आले होते.

आपले स्वप्न पूर्ण होत असल्याचे पाहून ती आनंदात होती. हेच आनंदाचे क्षण आपल्या परिवारासोबत घालवण्यासाठी 30 जानेवारी 2011 रोजी ती आपली आई, भाऊ-बहीण आणि सावत्र पित्यासोबत नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथील स्वतःच्या मालकीच्या फार्महाऊसवर गेली होती, पण तिचा सावत्र पिताच लालसेने ग्रासून आपल्या सार्‍या परिवाराचा अंत करेल याची तिला काडीमात्र कल्पना आली नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये हॉटेल, घर, जमीन, मुंबईत दोन ठिकाणी फ्लॅट, इगतपुरी येथे फार्महाऊस अशी गडगंज संपत्ती नावावर असलेल्या लैला खानची आई शेलिना हिने परवेज टाक नामक एका व्यक्तीशी तिसरे लग्न केले होते; मात्र घटस्फोटानंतरही तिचे आपला दुसरा पती आसिफ शेख याच्याशीही मधुर संबंध होते. शेलिनाचा दुसरा पती परवेज टाक अत्यंत लालची वृत्तीचा व्यक्ती होता. त्याने फक्त पैशाखातर शेलिनासोबत लग्न केले होते; मात्र परवेझशी झालेल्या तिसर्‍या लग्नानंतर तिचा मनात दुबईला जाऊन स्थायिक होण्याचा विचार घोळत होता; मात्र लग्नानंतर सतत शेलिनाच्या संपत्तीवर नजर ठेवून असलेल्या परवेज टाक यास शेलिना त्यास सोडून दुबईला निघून जाईल व आपल्याला सोबत नेणार नाही, अशी भीती वाटू लागली होती. कारण त्याच्याकडे परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट नव्हता.

शेलिना आपल्यास सोडून दुबईला निघून गेली तर हातातून गडगंज संपत्ती निसटून जाईल अशी त्यास सारखी भीती वाटत होती. त्यातच शेलिना हिचे तिचा दुसरा पती आसिफ शेख सोबतच्या जवळच्या संबंधांमुळे तो असुरक्षित होता. आपणाला सोडून ती परत शेखला जवळ करील की काय, अशी त्याचा भीती होती. त्याचवेळी लैला देखील तिचा प्रियकर वफी खानशी लग्न करण्याचा विचार करत होती.

पत्नी सोडून गेली आणि सावत्र मुलीने देखील लग्न केले तर त्यांची संपत्ती आपल्यास मिळणार नाही, याची जाणीव होऊन परवेज टाक अत्यंत अस्वस्थ झाला होता. तो सतत संपत्ती मिळवण्यासाठी काहीतरी करायला हवे असा प्लॅन आखत होता. अखेर त्यास ती संधी मिळाली ज्याची तो आतुरतेने वाट पाहत होता.

दिग्दर्शक राकेश सावंत यांनी आपल्या 'जन्नत' नामक चित्रपटात लैला खानला मुख्य अभिनेत्रीच्या रोलसाठी साईन केले होते. या चित्रपटाची शूटिंगदेखील सुरू झाली होती. नवा चित्रपट मिळाल्याने लैलाचा पूर्ण परिवार आनंदात होता. शूटिंगमधून वेळ मिळाल्यानंतर लैला, लैलाची आई सेलीना (51, तिची मोठी बहीण अजमीना (32), तिची जुळी बहीण जारा, छोटी बहीण रेश्मा, भाऊ इमरान (25) आणि सावत्र पिता परवेज या सगळ्यांनी 30 जानेवारी 2011 रोजी आपल्या इगतपुरी येथील फार्महाऊसवर जाण्याचा व मनमुराद आनंद लुटण्याचा प्लॅन केला होता. त्यानुसार सारा परिवार एका सफेद स्कॉर्पिओ आणि मित्सुबिशी आऊटलँडर अशा दोन गाड्यांमधून इगतपुरीच्या फार्म हाऊसवर पोहोचले.

तेथे गेल्यावर आधीच योजना बनवून ठेवलेल्या परवेज टाक याने आपली पत्नी शेलिना व पाच सावत्र मुलांची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर ही घटना उघडकीस येऊ नये म्हणून फार्म हाऊसमध्ये आग लावून तो घटनास्थळावरून फरार झाला होता. हे हत्याकांड घडवल्यानंतर परवेज स्कॉर्पिओ कार घेऊन थेट जम्मू काश्मीरमध्ये पळाला.

इकडे लैला खान व तिचा संपूर्ण परिवार अचानक बेपत्ता झाल्याने मार्च 2011 मध्ये लैलाचे वडील नादिर पटेल यांनी त्यांच्या अपहरणाची तक्रार पोलिसात दाखल केली. या तक्रारीत त्यांनी परवेज टाक व शेलिनाचा दुसरा नवरा असिफ शेख या दोघांवर अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा कसून तपास सुरू केला. पोलिसांनी लैला खान हिच्या इगतपुरीच्या फार्महाऊसची तपासणी केली असता तेथे सहा जणांचे कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळून आले अन या हत्याकांडाला तब्बल नऊ महिन्यानंतर वाचा फुटली.

पोलिसांचा संशय परवेज टाक याच्यावर गेल्यानंतर त्यास जम्मू-काश्मीरमधून अटक करण्यात आली. या हत्याकांडाचा खटला 13 वर्षे न्यायालयात सुरू होता. या खटल्यात चाळीस साक्षीदारांची साक्ष व आरोपीचा कबुली जबाबावरून मुंबई सत्र न्यायालयाने अखेर 24 मे 2024 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. एक उभरती अभिनेत्री व तिचा संपूर्ण परिवार एका लालची माणसाच्या विकृतीमुळे बळी पडला.

लैलाही वादग्रस्त!

बॉलीवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत 2008 मध्ये 'वफा' चित्रपटातील भूमिकेमुळे लैला खान नावारूपास आली होती. त्यानंतर तिचा 'फरार' नावाचा एक सिनेमाही येऊन गेला. लैला खानचं मूळ नाव रेश्मा पटेल. तिचा पहिला विवाह मुनीर खान याच्याशी झाला होता; मात्र मुनीर हा 'हरकत-उल-जिहाद अल इस्लामी' या बंदी असलेल्या बांगलादेशी संघटनेचा सदस्य असल्याचा आरोपही त्यावेळी झाला होता. लैला खानने लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेला मुंबई शहराची माहिती देऊन हल्ल्याची योजना आखल्याचाही आरोप लैलासह तिच्या निकटवर्तियांवर त्यावेळी झाला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news