‘फोर्ब्स’च्या 100 यशस्वी महिलांच्या यादीत चार भारतीय | पुढारी

‘फोर्ब्स’च्या 100 यशस्वी महिलांच्या यादीत चार भारतीय

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था : ‘फोर्ब्स’ मासिकाच्या अमेरिकेतील 100 सर्वात यशस्वी महिलांच्या यादीत भारतीय वंशाच्या चार महिलांनी स्थान मिळवले असून, त्यात मराठमोळ्या नेहा नारखेडे या तरुण महिला उद्योजिकेचाही समावेश आहे.

‘फोर्ब्स’ या मासिकाने नुकतीच अमेरिकेतील सर्वात यशस्वी महिलांची यादी प्रकाशित केली आहे. त्यात आपापल्या क्षेत्रात यशस्वी ठरलेल्या महिलांचा समावेश असून, त्यात यंदा भारतीय वंशाच्या चार महिलांचा समावेश आहे. त्यात जयश्री उल्लाल या 17 व्या स्थानावर, नीरजा सेठी या 25 व्या स्थानावर, नेहा नारखेडे या 50 व्या स्थानावर, तर इंद्रा नुयी 77 व्या स्थानावर आहेत. या चौघींपैकी इंद्रा नुयी वगळता उर्वरित तिघीही सॉफ्टवेअर क्षेत्र गाजवत आहेत.

कोण आहेत नेहा नारखेडे?

‘फोर्ब्स’च्या यशस्वी महिलांच्या यादीत समावेश झालेल्या नेहा नारखेडे या मूळच्या पुण्याच्या आहेत. 2002 ते 2006 या काळात त्यांनी पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठातून बी.ई. केले. त्यानंतर अटलांटातील जॉर्जिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून त्यांनी कॉम्प्युटर सायन्समध्ये एम.एस. केले. प्रारंभी नोकरी व नंतर व्यवसायात पदार्पण करीत स्वतःचे स्थान निर्माण करणार्‍या नेहा यांची 2018 साली ‘फोर्ब्स’ मासिकाने जाहीर केलेल्या तंत्रज्ञान क्षेत्रातील जगातील ‘टॉप 50’ महिलांच्या यादीत त्यांचा समावेश केला होता.

जयश्री उल्लाल
स्थान : 15 वे
संपत्ती : 2.2 अब्ज डॉलर
क्षेत्र : कॉम्प्युटर नेटवर्किंग
वय : 62
सिलिकॉन व्हॅलीत अभियंता म्हणून काम करणार्‍या जयश्री यांनी सिस्को कंपनीत बराच काळ नोकरी केली. त्यानंतर त्या अ‍ॅरिस्टा नेटवर्क्स कंपनीत सीईओ म्हण्ाून रुजू झाल्या. 2022 मध्ये कंपनीच्या महसुलात आदल्या वर्षीच्या तुलनेत 48 टक्क्यांची वाढ होत 4.4 अब्ज डॉलरवर महसूल पोहोचला.

नीरजा सेठी
स्थान : 25 वे
संपत्ती : 99 कोटी डॉलर
क्षेत्र : आयटी कन्सल्टिंग
वय : 68
पती भारत देसाई यांच्यासोबत टाटा कन्सल्टन्सीत कारकिर्दीची सुरुवात करणार्‍या नीरजा यांनी सिंटेल ही आयटी कंपनी 1980 मध्ये सुरू केली. मिशिगनच्या घरातून सुरू केलेल्या या कंपनीने आयटी क्षेत्रात स्थान निर्माण केले. 2018 मध्ये ही कंपनी अ‍ॅटोस या फे्रंच कंपनीला 3.4 अब्ज डॉलरला विकली.

नेहा नारखेडे
स्थान : 50 वे
संपत्ती : 52 कोटी डॉलर
क्षेत्र : सॉफ्टवेअर
वय : 38
प्रारंभी काही काळ सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून नोकरी. नंतर ऑॅसिलार ही फ्रॉड डिटेक्शन कंपनी पतीसोबत स्थापन केली. 20 अब्ज डॉलरचे फंडिंग असलेल्या कंपनीच्या त्या सीईओ आहेत. याआधी त्या कॉन्फ्लुअंट या कंपनीच्या सहसंस्थापकही राहिल्या आहेत. या कंपनीचे बाजार मूल्यांकन 9.1 अब्ज डॉलर आहे.

इंद्रा नुयी
स्थान : 77 वे
संपत्ती : 35 कोटी डॉलर
क्षेत्र : पेप्सी
वय : 67

अमेरिकेतील ‘टॉप 50’ कंपन्यांपैकी एक असलेल्या पेप्सीको कंपनीच्या त्या पहिल्या श्वेतेतर सीईओ ठरल्या आहेत. पेप्सीची धुरा सांभाळतानाच त्या अ‍ॅमेझॉन, फिलिप्स या कंपन्यांच्या संचालक आहेत. नुकत्याच त्या डॉयश बँकेच्या नवीन जागतिक सल्लागार मंडळावर सल्लागार म्हणून नियुक्त झाल्या आहेत.

Back to top button