अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या हत्‍येचा कट! भारतीय वंशाच्‍या तरुणाला अटक | पुढारी

अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्षांच्‍या हत्‍येचा कट! भारतीय वंशाच्‍या तरुणाला अटक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे सरकारी निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊस परिसरातील बॅरिकेट्‍सला ट्रकने धडक दिल्‍या प्रकरणी पोलिसांनी भारतीय वंशाच्‍या तरुणाला अटक केली आहे. साई वर्शित कंदुला (वय १९) असे त्‍याचे नाव आहे. राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ( US President Joe Biden ) यांच्‍या हत्‍येचा कट रचला हाेता, अशी कबुली त्‍याने दिली आहे.

सोमवारी ( दि. २२) रात्री दहाच्या सुमारास ट्रक चालक कंदुला याने व्हाईट हाऊस परिसरातील बॅरिकेड्सला धडक दिली.
त्‍याला तत्‍काळ अटक करण्यात आली. कंदुला याच्यावर अमेरिकेच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष, उपराष्‍ट्राध्‍यक्ष आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याची, अपहरण करण्याचा कट रचल्‍याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी व्हाईट हाऊसच्या माध्‍यम सचिव कॅरिन जीन-पियरे यांनी सांगितले की, ट्रकने राष्‍ट्राध्‍यक्ष निवासस्‍थानासमोरील बॅरिकेट्‍सला धडक दिली. यापूर्वीच अध्यक्ष ज्‍यो बायडेन व्हाईट हाऊसमध्‍ये आत होते. या घटनेची माहिती तत्‍काळ राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना देण्यात आली नाही.

घटनास्‍थळावरुन नाझी झेंडेही जप्त

युनायटेड स्टेट्स पार्क पोलिस, एफबीआय आणि यूएस कॅपिटल पोलिसांसह गुप्त सेवेतील अधिकार्‍यांनी अटक करण्यात आलेल्या तरुणाची चौकशी केली. कंदुला याच्यावर धोकादायक शस्त्राने हल्ला, मोटार वाहनाचे निष्काळजीपणे चालवल्‍याचा आरोप ठेवण्‍यात आला आहे. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, आरोपींनी जाणूनबुजून बॅरिकेट्‍सला धडक दिली आहे. घटनास्थळावरुन अधिकाऱ्यांनी नाझी झेंडेही जप्त केले आहेत.

संशयिताने व्हाईट हाऊसबद्दल धमकी देणारी विधाने केली; परंतु त्याला तत्‍काळ ताब्यात घेण्यात आले. बॅरिकेट्‍सला धडकलेल्या ट्रकमध्ये कोणतीही शस्त्रे किंवा स्फोटके नव्हती. या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. या घटनेनंतर वॉशिंग्टन पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असल्‍याचे स्‍थानिक पोलिसांनी स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button