..आणि टाकेवाडीच्या कालव्यावरील पूल कोसळला! | पुढारी

..आणि टाकेवाडीच्या कालव्यावरील पूल कोसळला!

मंचर : पुढारी वृत्तसेवा : हुतात्मा बाबू गेनू सागर (डिंभे धरण)वर असलेला आंबेगाव तालुक्यातील टाकेवाडी येथील डावा कालव्यावरील पूल मंगळवारी (दि. 7) रात्री कोसळला. परिणामी, नागरिकांचा संपर्क तुटला आहे. या पुलाची उभारणी तातडीने करावी अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. टाकेवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पाटीलवाडी, चिखलेमळा, वायाळमळा, शिंदेमळा, दरेकरवस्ती, ठाकरवाडी आणि टाकेवाडी गावठाण आदी भागांतील नागरिकांना ये-जा करण्यासाठी कुकडी जलसंपदा विभागामार्फत 25 ते 30 वर्षांपूर्वी पूलाचे बांधकाम केले होते. या पुलावरून दररोज अनेक वाहने ये-जा करतात. नुकतेच कुकडी पाटबंधारे विभागाने कालव्याला पाणी सोडले आहे.

मंगळवारी रात्री अचानकपणे कालव्यावरील पूल कोसळला. परिसरातील नागरिकांनी वेळीच पुलाच्या दुतर्फा दगडी व लाकडाच्या साहाय्याने रस्ता बंद करून वाहतूक थांबविली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पूल कोसळल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. सद्यस्थितीत डाव्या कालव्याला धरणातून सोडल्यामुळे लवकरात लवकर उपाययोजना न झाल्यास कालवा फुटून कालव्याच्या खालील बाजूस असलेल्या विठ्ठलवाडी, नांदूर, रामवाडी या गावांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असेही ग्रामस्थ दीपक चिखले व प्रदीप चिखले यांनी सांगितले.

कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक 1 चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर व उपविभागीय अधिकारी दत्ता कोकणे यांच्यासह महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. या वेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकित जाधव, उद्योजक अनिल चिखले, सरपंच प्रीती राहुल चिखले, उपसरपंच समीर काळे, पोलिस पाटील उल्हास चिखले आदी उपस्थित होते.

पुलाचे काम लवकर मार्गी न लागल्यास लोकसभा निवडणूक मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात येईल. याबाबत ग्रामस्थ विचार करीत आहेत.

– अनिल चिखले, उद्योजक, टाकेवाडी.

हेही वाचा

Back to top button