दुष्‍यंत चौटालांनी केली हरियाणा सरकारची ‘कोंडी’, राज्‍यपालांना लिहिले पत्र | पुढारी

दुष्‍यंत चौटालांनी केली हरियाणा सरकारची 'कोंडी', राज्‍यपालांना लिहिले पत्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : हरियाणातील राजकीय परिस्‍थिती पाहता विधानसभेत तत्‍काळ बहुमत चाचणी घेण्‍यात यावी, अशी मागणी हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जेजेपी जेजेपी नेते दुष्यंत चौटाला यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना पत्र लिहून केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीमध्ये तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांचे सरकार अडचणीत आल्‍याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच आता एकेकाळी भाजपचे मित्र अशी ओळख असणारे दुष्‍यंत चौटाला यांनी बहुमत चाचणी घेण्‍याची मागणी केली आहे. आता राज्‍यपाल कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

भाजपच्या राजवटीत महागाई आणि बेरोजगारी वाढल्याचा आरोप करीत तिघा अपक्ष आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतल्याचे जाहीर केले. या तिघा आमदारांमध्ये सोमबीर सगवान, धरमपाल गोंदर आणि रणधीर गोलन यांचा समावेश आहे. या तिघांनी काँग्रेसला पाठिंबा देत असल्याची भूमिकाही जाहीर केली. दरम्यान, जननायक जनता पक्षाचे (जेजेपी) नेते आणि हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी बुधवारी काँग्रेसला नायबसिंह सैनी सरकार पाडण्याची खुली ऑफर दिली. दुष्यंत चौटाला यांनी हरियाणा सरकारबाबत मोठे वक्तव्य केले आहे. सध्या भाजप सरकार अल्पमतात आहे. सरकार पडले तर काँग्रेसला बाहेरून पाठिंबा देऊ, असे त्यांनी म्हटले होते.

नायबसिंह सैनी सरकारकडे २ आमदार कमी

हरियाणा विधानसभेत ९० सदस्यांच्या सभागृहात सध्याचे एकूण संख्याबळ ८८ आहे. दोन जागा रिक्त आहेत. हरियाणा विधानसभा वेबसाइटच्या माहितीनुसार, विधानसभेत भाजपचे ४०, काँग्रेसचे ३०, दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीकडे १० आणि अपक्ष ७, इंडियन नॅशनल लोक दल आणि एचएलपी यांच्याकडे प्रत्येकी १ आमदार आहे. इतर दोन अपक्षांचा पाठिंबा असलेल्या नायबसिंह सैनी सरकारला हरियाणा विधानसभेत बहुमतासाठी आणखी दोन आमदारांची गरज आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button