Lok Sabha Election 2024 | दिंडोरीत गाजणार कांदा, पाणी अन् दुष्काळाचा प्रश्न, गेल्या निवडणुकीत काय होती परिस्थिती? | पुढारी

Lok Sabha Election 2024 | दिंडोरीत गाजणार कांदा, पाणी अन् दुष्काळाचा प्रश्न, गेल्या निवडणुकीत काय होती परिस्थिती?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभेची निवडणूक खऱ्या अर्थाने भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट अशी दुहेरी होणार हे निश्चित झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने भाजपच्या केंद्रीय आरोग्यराज्य मंत्री डॉ. भारती पवार आणि राष्ट्रवादीचे भास्कर भगरे यांच्यात सरळ लढत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात प्रचाराच्या मुद्यांमध्ये खरी भिस्त कांदा प्रश्नासोबतच पाणी, मांजरपाडा, दुष्काळ तसेच शेतकरी आत्महत्या या विषयांवरच अधिक आहे.

दिंडोरी लोकसभेची रचना बघितल्यास पश्चिमेकडील आदिवासी तालुका ते पूर्वेकडील सधन तसेच दुष्काळजन्य तालुके अशी आहेत. यामध्ये पूर्वेकडील दिंडोरी, पेठ, सुरगाणा व कळवण या आदिवासीबहुल तालुक्याचा समावेश, तर पूर्वेकडे जाताना निफाड, येवला, चांदवड, नांदगाव या सधन तालुक्यांचा समावेश आहे. मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या असलेल्या डॉ. भारती पवार यांनी २०१९ मध्ये ऐनवेळी पक्षांतर करत भाजपकडून तिकीट मिळवले आणि खासदार झाल्या. जनतेने खासदार म्हणून त्यांना संधी दिली. मात्र, दिल्लीमधून त्यांना मंत्रिपदाची ऑफर आल्यानंतर जनतेशी त्यांचा संपर्क कमी झाल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. त्याचवेळी आयात उमेदवार म्हणूनदेखील मूळच्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. त्यामुळे भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामेदेखील दिले आहे. कांदा निर्यातबंदीबाबत काहीही प्रयत्न न करणे या बाबींचा प्रचारामध्ये विरोधक समावेश करत आहेत. महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादीच्या आमदारांचे प्राबल्य असलेला हा मतदारसंघ असल्याने ते कितपत मदत करतील त्यावर यश-अपयशाचे गणित मांडले जात आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात नवा चेहरा जरी दिला असला तरी संघटनेचा अभाव यामध्ये दिसून येत आहे. त्यातच प्राधान्यक्रम ठरविल्यास या भागात शरद पवार यांना माननारा वर्ग जरी असला तरी याठिकाणी चार आमदार अजित पवार गटाचे आहेत. कांदा प्रश्नावर काय मार्ग निघेल, पाणी, दुष्काळजन्य परिस्थिती बघता त्यासाठी काही ठोस नियोजन आहे का? याचादेखील मतदार विचार करत आहेत. पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते भगरेंसोबत असले तरी जनता त्यांना कितपद दाद देईल हेदेखील बघणे आवश्यक आहे.

एकंदरीतच ही निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री असलेल्या भारती पवार आणि नवखे उमेदवार भास्कर भगरे या दोघांनादेखील सोपी नसल्याची सद्यस्थिती आहे. माकपचे जे. पी. गावित यांनी घेतलेली माघार कोणाच्या पथ्यावर पडेल हे अद्याप सांगता येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

गेल्या निवडणुकीतील परिस्थिती

डॉ. भारती पवार (भाजप) ५ लाख ६७ हजार ४७०

धनराज महाले (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) ३ लाख ६८ हजार ६९१

जीवा पांडू गावित (माकप) १ लाख ९ हजार ५७०

 हेही वाचा –

Back to top button