ऑस्ट्रेलियाकडून कोरोना चितपट; परिस्थिती हाताळली तरी कशी? | पुढारी

ऑस्ट्रेलियाकडून कोरोना चितपट; परिस्थिती हाताळली तरी कशी?

कोल्हापूर : पुढारी डेस्क

ऑस्ट्रेलियामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण 25 जानेवारी रोजी आढळून आला होता. म्हणजे, वुहानमध्ये कहर सुरू असतानाच्याच काळात. मग पुढच्या 6 आठवड्यांत 80 केसेस समोर आल्या. यानंतर 8 ते 29 मार्चदरम्यान कोरोनाच्या प्रादुर्भावाला वेग आला. सर्वात जास्त रुग्ण 29 मार्च रोजी आढळून आले. मृतांची संख्याही 19 पर्यंत पोहोचली होती. ऑस्ट्रेलियात पहिला बळी गेला, तो देशाबाहेर बाधित झालेल्याचा. जपानमध्ये योकोहामा बंदरावर समुद्रातच अडकलेल्या डायमंड प्रिन्सेस या जहाजातील 78 वर्षीय ऑस्ट्रेलियन संक्रमिताचा 1 मार्च रोजी पर्थ येथील एका रुग्णालयात मृत्यू झाला. या जहाजावर 160 ऑस्ट्रेलियन नागरिक होते. सर्वांना ऑस्ट्रेलियाने स्वतंत्र विमान पाठवून मायदेशी परत आणले होते.

अर्थात, या घटनेआधीच देशात कोरोना दाखल झालेला होता. हा पहिला मृत्यू झाला त्याच दिवशी न्यू साऊथ वेल्समध्ये कोरोनाचा 26 वा रुग्ण आढळून आला होता. इराणहून परतलेल्या दोघे जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न होताच इराण प्रवासावर निर्बंध घालण्यात आले. ऑस्ट्रेलियात सोशल डिस्टन्सिंगवर कडक निर्बंध असले तरीही संक्रमणाला पोषक ठरणार्‍या काही गोष्टी घडल्याच. उदा. देशातील संक्रमितांची संख्या 1000 वर पोहोचलेली असतानाही येथे राष्ट्रीय रग्बी लीग, फुटबाल ए लीग आणि अन्य असे काही सामने खेळविण्यात आले.

अर्थात, लगोलग सर्व प्रकारच्या क्रीडा आयोजनांवर बंदी घालण्यात आली हा भाग अलाहिदा. 15 मार्चपर्यंत या कारणांनीच कोरोनाने ऑस्ट्रेलियात धुमाकूळ घातला. नव्या रुग्णांचा चढा ग्राफ अखेर 17 मार्चनंतर खाली यायला सुरुवात झाली. या तारखेला पहिल्यांदाच 100 हून कमी (96) नवे रुग्ण आढळले. पुढे 28 मार्चला अचानक सर्वाधिक 457 नवे रुग्ण आढळून आले आणि एकच खळबळ उडाली. नंतर आणखी नवे निर्बंध घालण्यात आले. चाचण्या वाढविण्यात आल्या. कांगारूंच्या जिद्दीसमोर अखेर कोरोनाला गुडघे टेकावे लागले.

ऑस्ट्रेलियामध्ये 25 एप्रिल रोजी नवे 80 रुग्ण आढळून आले. मृतांची संख्या या तारखेपर्यंत 80 वर पोहोचली होती. नंतरच्या दोन दिवसांत दोनच जण मरण पावले होते. आज तर हे आकडे आणखी आकुंचित झालेले आहेत. कोरोना ओसरत चालल्याचेच हे द्योतक होते. सोशल डिस्टन्सिंगवर ऑस्ट्रेलियाने भर दिलेला असला तरी संपूर्ण लॉकडाऊन लागू केलेले नव्हते. विशेष म्हणजे, शाळा सुरूच ठेवण्यात आल्या होत्या. वर्गनिहाय विद्यार्थीसंख्येचे प्रमाण पाहता शाळेतही सोशल डिस्टन्सिंगला यशही आले. मुळात ऑस्ट्रेलियाची लोकसंख्याही कमी आहे आणि लोकसंख्येची घनताही कमी आहे. अर्थात, सोशल डिस्टन्सिंग इथे इतके कडक पाळले गेले, की लॉकडाऊनची गरजच भासली नाही. रस्त्यावर दोनपेक्षा जास्त लोकांना एकत्रित येण्यावर बंदी होती. संमेलने, सभा, धार्मिक मेळावे अशी सर्वांवर बंदी घातली होती. 60 वर्षे वयावरील सर्वांनी घरीच राहावे, हे मार्गदर्शक तत्त्व घालून देण्यात आले होते. कोरोनाचे रुग्ण आढळू लागताच हे सगळे सुरू झाले होते. सोशल डिस्टन्सिंगच्या अंमलबजावणीत उशीर झाला नाही. सर्व बाजूंनी समुद्रच असल्याने सीमा सील करणेही ऑस्ट्रेलियाला सोपे गेले. परदेशांतून येणार्‍या सर्वच लोकांना ऑस्ट्रेलियाने 14 दिवस सरकारी खर्चाने क्वारंटाईन कक्षात ठेवले होते. 

ऑस्ट्रेलिया कोरोना टुडे

या देशात संक्रमणाच्या सुरुवातीपासून ते आजअखेर 6 हजार 731 रुग्ण आढळून आले. पैकी 5 हजार 626 जण बरे झाले आहेत.  सध्या देशात 979 जण संक्रमित आहेत. म्हणजेच 96 टक्के रुग्ण बरे झाले आहेत. आजअखेर मृतांची संख्या 84 आहे. म्हणजेच मृत्यू दर एक टक्क्यापेक्षाही कमी आहे.

कोरोनासंदर्भात चीनची चौकशी व्हायलाच हवी. आम्ही चीनच्या भूमिकेचा तपास आमच्या पातळीवर काढूच. कोरोनाच्या आंतरराष्ट्रीय प्रादुर्भावाला चीनच जबाबदार आहे. एकापाठोपाठ एक आजार चीनमधूनच उद्भवत असतील आणि सगळ्या जगाला वेठीला धरत असतील, तर आम्ही काय समजावे?


स्कॉट मॉरिसन, पंतप्रधान, ऑस्ट्रेलिया

Back to top button