चीनला दणका! महाराष्ट्रातील व्यापा-यांचा दहा हजार कोटींच्या चिनी वस्तूंवर बहिष्कार | पुढारी

चीनला दणका! महाराष्ट्रातील व्यापा-यांचा दहा हजार कोटींच्या चिनी वस्तूंवर बहिष्कार

कोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

चीनविरोधात केंद्र सरकारने पुकारलेल्या व्यापार युद्धात ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापारी सज्ज झाले आहेत. व्यापारी नफा बघण्यापेक्षा देशहित डोळ्यासमोर ठेवून चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकत वर्षाला महाराष्ट्रात होणारी अंदाजे दहा हजार कोटी रुपयांची चिनी वस्तूंची आयात थांबवण्याचा निर्णय राज्यातील व्यापार्‍यांनी घेतला आहे. यासाठी कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडियाने पुढाकार घेतला आहे. कोरोना संकट काळात चिनी वस्तूंची आयात बंद असली, तरी यापुढे चिनी वस्तूंची विक्री न करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील व्यापारी वर्षाला होणार्‍या दहा हजार कोटी रुपयांच्या उलाढालीवर पाणी फेरणार आहेत.

सुईपासून बांधकाम साहित्यापर्यंत, महिलांच्या प्रसाधन साहित्यापासून ते तयार कपड्यांपर्यंत प्रत्येक उत्पादनावर चिनी वस्तूंचा सर्वाधिक प्रभाव दिसून येत आहे. यापूर्वी कित्येक वेळा चिनी वस्तूंवर बहिष्कार टाका असे आवाहन केले गेले, तरी लोकांवर त्याचा फारसा परिणाम होत नव्हता. चिनी वस्तूंनी आपल्या दैनंदिन जीवनात असा काही शिरकाव केला आहे की, या वस्तू आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनल्या आहेत. चिनी वस्तूंना दर्जा नाही; पण किंमत कमी म्हणून ग्राहकांना या वस्तू आकर्षित करत होत्या. ग्राहकांची मागणी म्हणून व्यापारीवर्ग या वस्तू विक्रीसाठी ठेवत होते.

देशातील चिनी वस्तूंची उलाढाल 5 लाख कोटींची

गेल्या काही वर्षांपासून भारतात चिनी वस्तूंची मोठ्या प्रमाणात आवक होत असे. चिनी वस्तूंची देशात होणारी आयात ही अंदाजे पाच ते सव्वापाच लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. महाराष्ट्रातील हा आकडा अंदाजे 25 हजार कोटी रुपयांच्या आसपास आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत पोहोचणार्‍या चिनी वस्तू या प्रथम मुंबईत येतात. नंतर स्थानिक व्यापार्‍यांच्या मागणीनुसार कंटेनरमधून या वस्तू त्या त्या जिल्ह्यात पाठवल्या जातात. सणासुदीच्या काळात दिवसाला दोनशे ते तीनशे कंटेनर संपूर्ण महाराष्ट्रात चिनी वस्तूंची वाहतूक करतात. लॉकडाऊनमुळे गेल्या 75 दिवसांपासून चिनी वस्तूंची आवक बंद आहे. या 75 दिवसांत महाराष्ट्रात दोन ते अडीच हजार कोटी रुपयांच्या चिनी वस्तूंची आवक झाली नसल्याने तेवढ्या रकमेचा फटका चिनी वस्तूंचे उत्पादन करणार्‍यांना बसला आहे. महाराष्ट्रात रोजच्या एकूण होणार्‍या उलाढालीतून चिनी वस्तूंच्या विक्रीतून अंदाजे 500 ते 600 कोटी रुपयांची उलाढाल होते. यामध्ये संगणक, इलेक्ट्रिकल वस्तू, मोबाईलपासून ते लहान मुलांची खेळणी, कटलरी साहित्य, कपडे, फेरीवाल्यांकडे मिळणार्‍या वस्तूंचा समावेश आहे. सर्वच चिनी वस्तूंची विक्री थांबवणे सध्या शक्य नाही; पण आगामी गणेशोत्सव तसेच दीपोत्सव काळात चिनी लाईट माळा, चिनी लाईटिंग, चिनी साऊंड सिस्टीम वापरण्यास ग्राहकांचाच नकार असणार आहे. याशिवाय दिवाळी सणात चिनी फटाके, बंदुका, चिनी आकाश कंदील खरेदी केले नाहीत, तर चिनी ड्रॅगनच्या व्यापारी युद्धताही मुसक्या आवळणे शक्य होणार आहे.

Back to top button