अमेरिका धावली भारताच्या मदतीला; ‘ते’ म्हणाले, ७० वर्षांची आपली मैत्री, अशीच राहील पुढेही | पुढारी

अमेरिका धावली भारताच्या मदतीला; 'ते' म्हणाले, ७० वर्षांची आपली मैत्री, अशीच राहील पुढेही

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

देशात कोरोना संकटाने जनजीवन अस्तव्यस्त करून टाकले असून त्यातून बाहेर पडण्यासाठी विदेशातून दान, भेट आणि मदत स्वीकारण्याच्या केंद्राने आपल्या धोरणात बदल केले. त्यानंतर देशाला अमेरिकेची पहिली मदत मिळाली आहे. अमेरिकेचे विमान शुक्रवारी दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले. अमेरिकेने या मदतीच्या पहिल्या स्लोटमध्ये ४०० ऑक्सिजन सिलिंडर, सुमारे १० लाख कोरोना टेस्ट किट आणि इतर उपकरणे पाठविली आहेत. याबाबतची माहिती अमेरिकी दूतावासाने ट्विटद्वारे दिली. या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘अमेरिकेहून कोरोनाशी लढण्यासाठी पहिले विमान भारतात पोहोचले आहे! गेल्या ७० वर्षांच्या मैत्रीत अमेरिका नेहमीच भारताबरोबर राहिली आहे. कोरोना संकटातही आम्ही एकत्र आहोत. यासह, #USIndiaDosti असे देखील लिहिले आहे. 

अधिक वाचा : इस्राईलमधील धार्मिक उत्सवात चेंगराचेंगरी, ४० जणांचा मृत्यू, १५० जखमी

याबरोबरच अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, येत्या काही दिवसांत अमेरिकन कंपन्या आणि लोकांकडून दान केलेली उपकरणेही घेऊन पुन्हा विमान येतील. याचदरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी कोरोना विरोधातील युद्धात आपण भारतासोबत असल्याचे जाहीर केलं आहे. तसेच बायडन यांनी एका ट्विटमध्ये म्हटले की, जसे कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात आमच्या देशातील रूग्णालयांत रग्णांसाठी जागा नव्हती, तेव्हा भारताने अमेरिकेला मदत केली. आता भारताच्या गरजेच्या वेळी आम्ही त्याच्या पाठीशी उभे आहोत. तर अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नेडा प्राइस यांनी देखील गुरुवारी सांगितले की, येत्या काही दिवसांत भारताला १०० दशलक्ष डॉलर्सचा पुरवठा केला जाईल.

तर याच्याआधी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्यात चर्चा झाली होती. त्याबाबतीत मोदींनी ट्विट करत म्हटले होते की, ‘आम्ही दोन्ही देशांमधील कोरोनाच्या संकटावर बोललो. यावेळी आम्हाला होणाऱ्या मदतीसाठी मी अध्यक्ष जो बायडन यांचे आभार मानले. 

अधिक वाचा : भारताला कॅनडाकडून एक कोटी डॉलर

यानंतर व्हाईट हाऊसकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यात, कोरोनाच्या नव्या लाटेने प्रभावित झालेल्या भारताला अमेरिकेने पूर्ण पाठिंबा देण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी केल्याचे म्हटले आहे. अमेरिकेकडून भारताला आपत्कालीन मदत पुरवित जात असून त्यात ऑक्सिजनशी संबंधित पुरवठा, लसीची सामग्री आहे. 

…आतापर्यंत सापडले १. ८३ कोटी रुग्ण 

आतापर्यंत देशात १.८३ कोटी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर मागील १० दिवसांपर्यंत दररोज ३ लाखांहून अधिक कोरोनाबाधित मिळत आहेत. या आकडेवारीवरून कोरोना संक्रमणात भारत दुसर्‍या क्रमांकावर आहे. एकट्या अमेरिकेत ३.२२ कोटी कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत ५.७ लाख बाधितांचा मृत्यू झाला असून भारतात मृतांचा आकडा हा २.०४ लाख आहे. 

Back to top button