गोवा राज्यात जोर कायम; हंगामातील सरासरी 50 इंच नोंद | पुढारी

गोवा राज्यात जोर कायम; हंगामातील सरासरी 50 इंच नोंद

पणजी;  पुढारी वृत्तसेवा :  मागील काही दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारीही कायम राहिला. पावसामुळे राज्यात ठिकठिकाणी झाडे पडून नुकसानीच्या घटना घडल्या. सखल भागांत पाणी साचल्याने जनजीवनावर परिणाम झाला. 1 जून ते 7 जुलैदरम्यान, राज्यात सरासरी 1271.6 मि.मी. (50.06 इंच) पाऊस पडला आहे.

शुक्रवारी सकाळी 8.30 पर्यंत राज्यात सरासरी 79.6 मि.मी. पावसाची नोंद झाली. पणजी, मडगाव, म्हापसा, जुने गोवा येथे पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान खात्याने 8 ते 10 जुलै दरम्यान, मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. यानुसार तीन दिवस यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शुक्रवारी पणजीला सकाळी व संध्याकाळी पावसाने झोडपले. नेहमीप्रमाणे पाणी रस्त्यावर साचल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला. मिरामार, कांपाल, 18 जून रस्ता, मळा, सांतीनेज परिसरात रस्त्यांवर पाणी साचले होते. खड्ड्यांमुळे रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथून वाहन चालवणे जिकरीचे बनले आहे.

धरणांची पातळी वाढली

जोरदार पावसामुळे धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. केवळ एका दिवसांत साळावली धरणाची पातळी 41.9 वरून 46.9 टक्के झाली. आमठाणेची पातळी 55.9 वरून 58.7 टक्के, पंचवाडीची पातळी 40.3 वरून 47.2 टक्के, चापोलीची पातळी 48.2 वरून 53.4 टक्के, गावणेची पातळी 55.1 वरून 60.7 टक्के, तर अंजुणेची पातळी 8.6 वरून 10.2 टक्के झाली.

Back to top button