मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे गोव्यापर्यंत | पुढारी

मुंबईतील पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे गोव्यापर्यंत

पणजी, पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ घोटाळ्याचे धागेदोरे गोव्यापर्यंत पोहोचले असल्याचे उघड झाले आहे. सक्तवसुली संचनालयच्या (ईडी) अधिकार्‍यांनी गोव्यातील गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रा. लि. कंपनीच्या नावावरील राकेश वाधवान आणि सारंगकुमार वाधवान यांची ३१.५० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हेही या प्रकरणात संशयित आरोपी असून त्यांना या प्रकरणी कोठडीत होते.

गोरेगाव येथील पत्राचाळ प्रकल्पाची पुनर्विकासाची जबाबदारी वाधवान यांच्या कंपनीकडे होती. यात एकूण ६७२ भाडेकरू होते. करारानुसार या प्रकल्पात भाडेकरूंना ६७२ सदनिका, म्हाडासाठी काही सदनिका आणि उर्वरित सदनिकांची विक्री करावी व खर्च वसूल करावा, असे करारात ठरले होते. मात्र, कंपनीच्या संचालकांनी म्हाडाची दिशाभूल करून 9 विकसकांना ‘एफएसआय’ विकला आणि ९०० कोटींची कमाई केली. भाडेकरूंना सदनिका दिल्याच नाहीत. याशिवाय बेकादेशीर कामांतून संचालकांनी एक हजार कोटी कमावल्याचा ईडीचा आरोप आहे.

२०११ ते २०१६ या काळात राकेश वाधवान यांच्या खात्यातील ३८.५ कोटी रुपये इंडिया बुल्स फायनान्सच्या २८.५कोटींच्या कर्जाच्या हप्त्याच्या पूर्व पेमेंटसाठी वापरले गेले. या कर्जातून उत्तर गोव्यात ३१.५० कोटी रुपये किंमतीचे १२५० चौरस मीटर क्षेत्रफळाचे दोन भूखंड आणि १५,३०० चौरस मीटरचा भूखंड सारंग वाधवान यांनी वैयक्तिक खात्यातून खरेदी केल्याचा ईडीचा आरोप आहे. बेकायदा व्यवसायातून जमवलेली अंदाजे १,०३९.७९ कोटींची रक्कम राकेश कुमार वाधवान आणि सारंग वाधवान यांनी ‘एचडीआयएल’ आणि तिच्या समूह कंपन्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केली. त्यानंतर विविध कंपन्यांच्या मार्फत ही रक्कम आपल्या वैयक्तिक खात्यात वळवली. या कंपनीने सदनिका खरेदीदारांकडून सुमारे १३८ कोटी रुपये इतकी नोंदणी रक्कम जमा केली. त्यानंतर संचालकांनी बेकायदेशीर कामांमधून अंदाजे १०३९.७९ कोटींची रक्कम जमवली, असा ईडीचा आरोप आहे.

हेही वाचंलत का?

Back to top button