गोवा : रंगपंचमी बेतली जीवावर; वास्कोत दोघांचा बुडून मृत्यू | पुढारी

गोवा : रंगपंचमी बेतली जीवावर; वास्कोत दोघांचा बुडून मृत्यू

वास्को : पुढारी वृत्तसेवा : रंगपंचमी साजरी केल्यानंतर अंघोळीसाठी समुद्राच्या पाण्यात उतरलेला सडा येथील सुश्रुत सातार्डेकर हा अठरा वर्षीय युवक सडा येथील समुद्रात, तर एक चाळीस वर्षीय इसम बायणा समुद्रात बुडाला. बायणा येथील या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रंग खेळल्यावर सडा येथील युवकांचा एक गट जापनीज गार्डनखाली असलेल्या समुद्राकाठी गेला होता. त्यापैकी चार-पाचजण अंघोळीसाठी समुद्रात उतरले. त्यामध्ये सुश्रुत सातार्डेकर याचाही समावेश होता. तेथे काही वेळ अंघोळ केल्यावर ते काठावर आले. काही वेळाने सुश्रुत पुन्हा समुद्रात अंघोळीसाठी उतरला. काही वेळाने तो दिसेनासा झाल्याने त्याच्या मित्रांनी पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सापडला नाही.

दृष्टीच्या जीवरक्षकांना माहिती मिळताच ते तेथे पोहचले. त्यांनी शोध घेऊन सुश्रुत याला पाण्यातून बाहेर काढले. त्याला उपचारासाठी
चिखली उपजिल्हा इस्पितळात नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तो खासगी आस्थापनात कामाला होता. त्याच्या पश्चात आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार आहे.

दुसर्‍या घटनेत, एक चाळीस वर्षीय व्यक्ती बायणा येथे समुद्रात अंघोळीसाठी उतरली होती. अंघोळ करताना अचानक बुडू लागल्यावर त्यांनी आरडाओरडा केला. तेथील जीवरक्षकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून चिखली उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना उपचारापूर्वी मृत घोषित केले. त्यांची ओळख पटवण्याचा पोलिस प्रयत्नात आहेत.

Back to top button