गोवा : छोट्या व्यावसायिकांना 15 दिवसांत 5 हजार : सुभाष फळदेसाई | पुढारी

गोवा : छोट्या व्यावसायिकांना 15 दिवसांत 5 हजार : सुभाष फळदेसाई

पणजी; पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या काळात लहान व्यावसायिकांवर मोठे संकट आले होते. हजारो गरीब लोकांचे व्यवसाय बंद झाले होते. अशा व्यावसायिकांसाठी राज्य सरकारने बुधवारी आनंदाची बातमी दिली. अलहान व्यावसायिकांना येत्या पंधरा दिवसांत, एकदाच आणि एकरकमी प्रत्येकी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे, ही माहिती समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर फळदेसाई यांनी सांगितले की, कोरोना नियंत्रणात येऊन बराच कालावधी उलटला तरी अद्याप अर्ज केलेल्यांना आर्थिक मदत देता आली नव्हती. कारण त्यासाठी निधीची तरतूद झाली नव्हती. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या लोकांना प्रत्येकी पाच हजार रुपये देण्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, असे फळदेसाई यांनी सांगितले.

यांना मिळणार मदत…

गोव्यातील लहान गाडे चालक, टेम्पो चालक, रिक्षा चालक, खाजेकार, फिरते दुकानदार अशा हातावर पोट असलेल्या गरिबांना पाच हजार रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहेत. बुधवारी मंत्रिमंडळाने त्यासाठी 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. या योजनेसाठी एकूण 90 हजार अर्ज आले आहेत व त्यासाठी 45 कोटींची गरज आहे. मात्र, बुधवारी मंजूर झालेले 20 कोटी पहिल्या 40 हजार जणांना देण्यात येणार असून येत्या अर्थसंकल्पामध्ये आणखी 25 कोटी रुपये मंजूर केले जातील व ते उर्वरित 45 हजार अर्जदारांना दिले जातील. नवे अर्ज स्वीकारले जाण़ार नाहीत, असे फळदेसाई यांनी सांगितले.

सरकार जी आश्वासने देते ती आश्वासने पाळते. आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे आहे, त्यांच्यासाठी शक्य ते सर्व आम्ही करतो आहोत आणि करत राहू.
– सुभाष फळदेसाई, समाज कल्याण मंत्री

 

Back to top button