गोवा : लघू उद्योजकांसाठी गूड न्यूज | पुढारी

गोवा : लघू उद्योजकांसाठी गूड न्यूज

पणजी, पुढारी वृत्तसेवा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी लघुउद्योजकांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. केंद्र सरकारने एमएसएमईच्या माध्यमातून उद्योगवाढीसाठी पाच लाख कोटींची तरतूद केली आहे. गोव्यासारख्या लाखो पर्यटक येणार्‍या राज्यात पर्यटनपूरक उद्योग उभारण्यास मोठा वाव आहे. केंद्र सरकारच्या सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग (एमएसएमई) खात्याच्या माध्यमातून उद्योगवाढीसाठी भरीव अनुदान देण्यास आपण तयार आहे. तसेच गोव्यात लवकरच एमएसएमईचे कार्यालय स्थापन केले जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय एमएसएमई खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी केली.

पणजी दोनापावला येथील दरबार हॉलमध्ये शुक्रवारी उद्योग भरती गोवा तर्फे आयोजित लघू उद्योजकांच्या महामेळाव्यात राणे बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उद्योग भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष बलदेव प्रजापती, उपाध्यक्ष रवींद्र सोनावणे, गोवा उद्योग भारती अध्यक्ष राजकुमार कामत, बॉम्बे एक्स्चेंजचे प्रमुख अजय ठाकूर, एमएआयटीचे अध्यक्ष नितीन कुकळ्येंकर, पंजाब नॅशनल बँकेचे कार्यकारी संचालक विजय दुबे आदी उपस्थित होते.

यावेळी सुमारे उपस्थित 500 च्या लघू उद्योजकांना मार्गदर्शन करताना राणे यांनी सांगितले की, ज्या वस्तूंची बाजारात गरज आहे ती वस्तू उत्पादित केल्यास त्याला चांगला भाव मिळतोे. चीनमधील अनेक उद्योग कोरोनामुळे बंद झालेले आहेत. तेथून आयात होणार्‍या वस्तू गोव्यात तयार करण्याचे ध्येय गोवेकरांनी ठेवावे. त्याच्या माध्यमातून स्वतःचा विकास करावा. त्यासाठी हवे तेवढे अर्थसाहाय्य उपलब्ध केले जाईल.

ते म्हणाले, गोव्यात आयात होणार्‍या वस्तू, दूध, फळे, फुले, भाजी यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून त्यातून आपली उद्योजकता दाखवण्याची संधी गोवेकरांना आहे. लघुउद्योजक हेच बेरोजगारी कमी करणारे मुख्य घटक असल्यामुळे लघुउद्योजकांना हवे ते सहकार्य करण्याचे धोरण केंद्र सरकारने ठेवले आहे.

उद्योग भारतीने देशातील उद्योग वाढावेत व मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावेत यासाठी जे प्रयत्न सुरू केलेले ते स्तुत्य आहेत. राज्यांमध्ये उद्योग यावेत यासाठी पायाभूत सुविधा व इतर सवलती देण्याची गरजेचे आहे. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार त्यासाठी सकारात्मक असल्याचे राणे म्हणाले.

केंद्रातील विद्यमान सरकारने लघू उद्योगासाठी एमएसएमई हे नवे मंत्रालय स्थापन केल्यानंतर लघू उद्योजकांच्या गरजांवर गंभीरपणे विचार होऊन त्या सोडवल्या जातील. गोव्यातील बंदराचा विकास करून ते निर्यातीसाठी पूर्ण सज्ज असे बंदर करण्याची गरज असल्याचे नितीन कुकळ्येंकर यांनी सांगितले.

गोव्यातील एकमेव मुरगाव बंदर हे लघू उद्योजकांच्या उत्पादित वस्तू निर्यात करणारे मुख्य केंद्र व्हावे यासाठी सरकारने प्रयत्न करावेत, अशी मागणी यावेळी राजकुमार कामत यांनी केली. याप्रसंगी बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज व गोवा सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. तसेच या महामेळाव्यात शेखर सरदेसाई, पल्लवी साळगावकर व दामोदर कोचकर या उद्योजकांची गौरव करण्यात आला.

संध्याकाळी समारोपाच्या सत्रामध्ये उद्योगमंत्री मावीन गुदिन्हो व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मार्गदर्शन केले.

गोव्यातून अंबानी अदानी तयार व्हावेत

देशात अंबानी व अदानी या उद्योगपतींची नावे गेली अनेक वर्षे घेतली जातात. त्यांच्या यादीत गोवेकरांनी जाण्याचे ध्येय ठेवून तसे प्रयत्न करण्याचे आवाहन आज नारायण राणे यांनी केले व उद्योग उभारण्यासाठी हवी ती मदत देण्याचे आश्वासन दिले.

गोव्यात 90 टक्के वस्तू येतात बाहेरून : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी यावेळी सांगितले की, गोव्यामध्ये लाखो पर्यटक येतात; मात्र त्यांना लागणार्‍या महत्त्वाचे दूध, भाजी, फळे, चिकन आदी आम्हाला आयात कराव्या लागतात. पर्यटकांच्या गरजेच्या 90 टक्के वस्तू बाहेरून आयात कराव्या लागत असल्यामुळे तेवढा पैसा बाहेर जातो. हा पैसा गोव्यात राहावा यासाठी गोव्यातील उद्योजकांनी त्यांच्या उत्पादनावर भर द्यावा. आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाद्वारे गोवेकर स्वयंपूर्ण व्हावेत यासाठी जे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, त्याला लघुउद्योेजकांनी या वस्तूंच्या उत्पादनात उतरून सहकार्य करावे. संकटाचे रूपांतर संधीत करून प्रत्येक बेरोजगारांनी उद्योजक होण्याचे ध्येय ठेवणे गरजेचे आहेे. पूर्वी काजूगर व मासे गोव्याची खासियत होती; मात्र त्याही वस्तू बाहेरून आयात कराव्या लागतात.

संजय राऊतला पत्रकार मानत नाही : नारायण राणे

संजय राऊत हा कोण आहे हो? संजय राऊत यांना मी पत्रकार मानत नाही. त्यामुळे त्यांच्याविषयी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. तेच पळपुटे आहेत, अशी शेरेबाजी नारायण राणे यांनी केली. महामेळाव्यानंतर काही पत्रकारांनी त्यांना संजय राऊत यांच्याविषयी प्रतिक्रिया विचारली. राजवस्त्रे उतरवून या, आम्ही पळपुटे नाही, असे आव्हान राऊत यांनी आपणास दिले आहे. त्याविषयी तुमचे मत काय? असा प्रश्न एका पत्रकाराने मोठ्या आवाजात विचारला. त्यावर राणे बोलण्यास इच्छुक नव्हते. जाता जाता ते म्हणाले, तो पळपुटा आहे म्हणूनच तो असे बोलतोय. यानंतर राणे पुढे जाऊ लागले. पत्रकाराने पुन्हा हाच प्रश्न विचारला. यावर त्राग्याने राणे म्हणाले, संजय राऊतला मी पत्रकार मानत नाही. त्यामुळे त्याच्या कमेंटवर मी उत्तर देणार नाही.

Back to top button