काँग्रेसने प्रचाराची रणनीती बदलली | पुढारी

काँग्रेसने प्रचाराची रणनीती बदलली

पणजी; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस पक्षाने शेवटच्या तीन दिवसांच्या प्रचाराची रणनीती बदलली आहे. जाहीर सभा घेण्याऐवजी वैयक्तिक भेटींवर भर दिला आहे. त्यासोबत म्हापशात शनिवारी, 4 मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जाहीर सभा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना निमंत्रित करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

राष्ट्रीय नेत्याची एखादी जाहीर सभा व्हावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. काँग्रेसची सभा होऊ नये, यासाठी भाजप प्रयत्नशील अधिक आहे. त्यासाठीच पक्षाची बँक खाती सील करण्यात आली आहेत, असे रमाकांत खलप म्हणाले. एका प्रकारचे दहशतीचे वातावरण तयार करण्यात आले आहे. जाहीर सभेसाठी बसमधून कार्यकर्त्यांना आणायचे म्हटले, तरी या बसेस काँग्रेसला उपलब्ध होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात असल्याचे असे ते म्हणाले.

काँग्रेस पक्षातील काही नेत्यांची अजूनही नाराजी दूर झाली नसल्याने अनेक नेते प्रचारापासून दूर आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात नेत्यांचे बळ कमी झाले आहे. पक्षापासून दुरावलेल्या नेत्यांना पक्षाकडे पुन्हा आणण्यास पक्षाला अपयश आल्याने त्याचा परिणाम काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारावर झाला आहे. सध्या मुख्यमंत्र्यांनी सर्व मतदारसंघ पिंजून काढण्यावर भर दिला आहे. भाजपच्या जाहीर सभाही झाल्या आहेत. स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून तसेच त्यांच्या मित्र पक्षाकडून म्हणावे तसे सहकार्य लाभले नसल्याने प्रचारादरम्यान त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. उत्तरेतील एकमेव काँग्रेस आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांच्या खांद्यावर पूर्ण जबाबदारी पडली आहे. तालुक्यातील 7 मतदारसंघांपैकी 6 मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. असे असले तरी मतदारांकडून उघड भूमिका घेण्यात आली नसल्याने चित्र अस्पष्ट आहे.

Back to top button