चारधाम यात्रेत प्रथमच भाविकांच्या संख्येवर मर्यादा | पुढारी

चारधाम यात्रेत प्रथमच भाविकांच्या संख्येवर मर्यादा

डेहराडून; वृत्तसंस्था : उत्तराखंडमध्ये 10 मेपासून चारधाम यात्रा सुरू होत आहे. आतापर्यंत 19 लाखांवर भाविकांनी नोंदणी केली आहे. गतवर्षी विक्रमी 55 लाख लोक या यात्रेला आले होते. परिणामी अनेकदा व्यवस्था कोलमडली होती. त्यातून उत्तराखंड पोलिस आणि पर्यटन विभागाने धडा घेतला असून यंदा पहिल्यांदाच चारधाम यात्रेत दररोज येणार्‍या भाविकांच्या संख्येवर मर्यादा घातली आहे.

पर्यटन सचिव सचिन कुर्वे यांनी दिलेल्या माहितीनुसार एका दिवसात 15 हजार भाविक केदारनाथ धामचे दर्शन घेऊ शकतील. 16 हजार लोक बद्रीनाथ धामचे दर्शन घेऊ शकतील आणि 9 हजार भाविक यमुनोत्रीला, तर 11 हजार भाविक गंगोत्रीचे दर्शन घेऊ शकतील. अशाप्रकारे दररोज 51 हजार लोक चारधामचे दर्शन घेऊ शकतील. गतवर्षी दररोज 60 हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येत होते. ऋषीकेशनंतर कोणाला बद्रीनाथला जायचे असेल तर त्यांना आधी श्रीनगरमध्ये थांबवले जाईल. दैनंदिन 15 हजारांच्या मर्यादेनंतर उर्वरित भाविकांना येथेच रात्र काढावी लागेल. दुसर्‍या दिवशी हीच प्रक्रिया रुद्रप्रयाग, त्यानंतर चमोली, पिपळकोटी आणि जोशीमठमध्ये केली जाईल. नंबर आल्यावरच पुढे निघता येईल. श्रीनगर, रुद्रप्रयाग, उखीमठ, गौरीकुंड येथे थांबल्यानंतरच केदारनाथ धामच्या भाविकांनाही पुढे नेले जाईल. गंगोत्री-यमुनोत्रीला जाणार्‍या भाविकांना टिहरी, चंबा, उत्तरकाशी येथे थांबवण्यात येणार आहे. या शहरांमध्ये एकावेळी 20 ते 30 हजार लोक राहू शकतील. चारधाम हॉटेल असोसिएशनने या निर्णयाला विरोध केला आहे. यामुळे व्यवसाय कमी होईल, अशी भीती असोसिएशनने वर्तविली आहे.

Back to top button