चौघा शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू; विजापूर, चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यांतील दुर्घटना | पुढारी

चौघा शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू; विजापूर, चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यांतील दुर्घटना

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : उष्णतेत वाढ झाल्याने पोहायला जाणार्‍यांची सख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या सुटीचे दिवस आहेत. यातच यात्रांही सुरू आहेत. त्यामुळे पोहायला जाण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. मात्र त्यातूनच विजापूर आणि चिक्कबळ्ळापूर येथे पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे.

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी तालुक्याच्या गोलगेरी गावाच्या विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोघा विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. 29) घडली. सोमशेखर अशोक आलमेर (वय 17) आणि मलिक हसनसाब नदाफ (वय 17) अशी मृत्यू झालेल्या युवकांची नांवे आहेत. विहिरीत पोहण्यासाठी पाच ते सहा जण गेले होते. पैकी सोमशेखर आणि मलिक या दोघांना पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडाले. इतरांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. आरडाओरड करून आजूबाजूच्या लोकांना बोलावून घेण्यात आले; मात्र तोपर्यंत ते बुडाले होते.

दुसरी घटना

शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यातील शिडलघट्टी तालुक्याच्या केंप्पनहळ्ळी येथे मंगवारी (30) घडली. नितीनकुमार (वय 15) आणि मंजुनाथ (16) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. नितीनकुमार आणि मंजुनाथ हे दोघे वर्गमित्र होते. नुकतीच त्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. यात्रेतील दुपारचे जेवण करून ते शेतळ्यात पोहण्यासाठी गेले होते; मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले.

Back to top button