दक्षिण गोव्यात पुन्हा आले म्याँव म्याँव | पुढारी

दक्षिण गोव्यात पुन्हा आले म्याँव म्याँव

मडगाव; विशाल नाईक :  दक्षिण गोव्यात 2013 ते 2016 पर्यंत मेफेड्रोन म्हणजेच म्याँव म्याँव नामक अमली पदार्थाने युवकांना कर्जबाजारी करून टाकले होते. गरीब लोकांचे कोकेन समजले जाणारे म्याँव दक्षिण गोव्यातील बाजारात पुन्हा आले आहे. जुने वर्ष सरता सरता पुन्हा सासष्टीत मेफेड्रोन दिसून आल्याने संपूर्ण गोव्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. दरम्यान, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस निरीक्षक अरुण गावस-देसाई यांनी फोन न उचलल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची प्रतिक्रिया कळू शकली नाही.

कोकेन हा अमली पदार्थ विश्वातील सर्वात महागडे आणि उच्चभ्रू लोकांच्या चैनीचे साधन. कोकेनच्या एका ग्रॅमची किंमत सध्या आठ हजार रुपये आहे. एका रात्रीच्या पार्टीसाठी तब्बल पंधरा ते वीस ग्रॅम कोकेन लागतो. हा खर्च खिशाला परवडत नसल्याने सामान्य कुटुंबातीतील युवा वर्ग पुन्हा मेफेड्रोन म्हणजेच म्याँव म्याँव या अमली पदार्थाकडे वळू लागला आहे. कोकेन आणि मेफेड्रोनमध्ये साम्य आहे. दिसायला दोन्ही अमली पदार्थ एकसारखेच आहेत. तरीही उच्च दर्जाचा कोकेन प्रति ग्रॅम आठ ते नऊ हजार रुपयांना विकला जातो तर म्याँव म्याँवच्या एका ग्रॅमची किंमत दीड हजार आहे. म्हणून म्याँव म्याँवला गरिबांचा कोकेन असे म्हटले जाते.

2013 ते 2017 पर्यत कुडचडे, सावर्डे आणि केपेत मेफेड्रोनने थैमान घातले होते. कित्येक युवक या नशेच्या आहारी गेले होते. त्यावेळी एका ग्रॅमच्या मेफेड्रोनची किंमत एक हजार रुपये होती. नरकासुराचे दहन आणि नविन वर्षाचे स्वागत म्याँव म्याँवने केले जायचे. 2017 नंतर अचानक मेफेड्रोनचा पुरवठा बंद झाला. गेली पाच वर्षे तो कुठेच नव्हता.

गोव्यात गांजा घेऊन येणार्‍या आणि गांजा विकणार्‍या पेंडलर्सवर पोलिस यंत्रणेने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे त्यांना बाहेर गावी जाऊन गांजा आणता येत नाही. त्यामुळे गोव्यातून गायब झालेला म्याँव म्याँव पुन्हा गोव्यात पार्ट्याची जान बनू लागली आहे. सरत्या वर्षात सुरू होणार्‍या संगीत रजनीच्या कार्यक्रमासाठी मेफेड्रोनचा साठा मागविला आहे. काणकोण येथे विदेशी युवतीवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील संशयीताने सर्वात प्रथम हा पदार्थ गोव्यात आणला होता. नुकतेच त्याला कोलवाळ तुरुंगातून पॅरोलवर सोडले आहे. त्याच दरम्यान गोव्यातील पार्टीत मेफेड्रोनचा वापर झाल्याचे उघड झाल्याने आहे.

कोकेनचा राज्यात तुडवटा भासत आहे. शिवाय कोकेनचे प्रमुख दलाल असलेले कित्येक नायजेरियन कोलवाळ तुरुंगात न्यायालयीत कोठडीत आहेत. अमली पदार्थ विक्री आणि व्हिसा संपून देखील गोव्यात त्यांनी केलेल्या बेकायदेशीर वास्तव्यासाठी त्यांच्यावर खटले सुरू आहेत. उत्तर गोव्यातील डिस्को आणि पबमध्ये संगीत रजनीचे कार्यक्रम सुरू झाले आहेत. कोकेनची कमतरता असल्याने या पार्ट्यांना म्याँव म्याँवची जोड दिली जात असल्याचे सूत्रांकडून समजते. कोकेनला पर्याय म्हणून गांजालाही मागणी वाढलेली आहे.

माजी आमदार पुत्रही सहभागी

दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्याच्या किनारपट्टी भागातील एका नामांकित शॅक वजा हॉटेलवर शनिवारी पार्टी झाली. या पार्टीत स्ट्रीट फाईट सुद्धा आयोजिली होती. एरव्ही त्याठिकाणी कोकेनच्या पार्ट्या होत असतात; पण शनिवारी म्याँव म्याँवची पार्टी रंगली. दक्षिण गोव्यातील माजी आमदाराचा पुत्रही त्या पार्टीत होता. सकाळपर्यंत डिस्कोमध्ये ही पार्टी सुरू होती. सुमारे वीस ग्रॅम मेफेड्रोनचा वापर यावेळी झाल्याची चर्चा रंगली आहे.

पाकिस्तानातून पंजाबमार्गे गोव्यात

मेफेड्रोन हा अमली पदार्थ पाकिस्तानातून पंजाब मार्गे गोव्यात येत आहे. अमेरिका, इस्रायल तसेच यूरोप खंडातील बर्‍याच देशांमध्ये मेफेड्रोनवर बंदी आहे. भारतात या ड्रग्जला वैद्यकीय कारणासाठी वापरला जाणारे रसायन म्हणून ओळखले जाते. या ड्रग्सचा वापर ईडीएम महोत्सवात जास्त केला जातो, असे बोलले जाते.

Back to top button