गोवा : मासळी विक्रेत्याचा दगडाने ठेचून खून | पुढारी

गोवा : मासळी विक्रेत्याचा दगडाने ठेचून खून

मडगाव; पुढारी वृत्तसेवा : गेल्या रविवारपासून बेपत्ता असलेल्या दिकरपाली येथील अख्तर रजाक या 22 वर्षीय मासळी विक्रेत्याचा मृतदेह चेहरा ठेचलेल्या अवस्थेत सां जुजे दि आरियल येथील कालव्याजवळ कुजलेल्या स्थितीत सापडला आहे. त्याचा दगडाने ठेचून खून केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

सां जुजे दि आरियल येथे चर्च पासून सुमारे पन्नास मीटर अंतरावर गवत कापण्यासाठी गेलेल्या स्थानिक लोकांना कुजलेल्या अवस्थेत गुडघाभर गवताच्या एक मृतदेह पडल्याचे दिसले. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. लोकांनी या घटनेची माहिती मायणा कुडतरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असता, मृतदेहाच्या चेहर्‍याचा चेंदामेंदा झाला होता. आजूबाजूला बर्‍याच प्रमाणात रक्तही सांडले होते. पोलिसांना तपासात मायणा कुडतरी पोलिस स्थानकाच्या हद्दीतून रविवारपासून रजाक हा मासळी विक्रेता गायब असल्याचे लक्षात आले. रजाक याचे काका सय्यद जबीर यांना घटनास्थळी बोलावले असता त्यांनी चप्पलांच्या माध्यमातून मृतदेहाची ओळख पटवली.

सय्यद जबीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रजाक हा रविवारी शेवटचा घरी आला होता. सकाळी मासळी विकून तो दुपारी जेवायला आला आणि दुपारी तीन वाजता घराबाहेर पडला. रात्री साडेदहाच्या दरम्यान त्याचा फोन सुरू होता. नंतर फोन लागत नसल्यामुळे त्याच्या गायब होण्याची तक्रार पोलिस स्थानकात नोंदवली होती.आपला पुतण्या मासळी विक्री करून उदरनिर्वाह चालवत होता असे त्यांनी सांगितले.

स्थानिक रहिवाशी पॉल परेरा यांनी बोलतांना सदर कालव्याच्या ठिकाणी जमुन काही युवक पार्ट्या करायचे आणि त्याविषयी आम्ही पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली होती. असे प्रकार पुन्हा घडू नयेत यासाठी पोलीस पेट्रोलिंग करावे अशी मागणी केली आहे

Back to top button