गोवा : दिशाभूल केल्याबद्दल स्मृती इराणींनी देशाची माफी मागावी | पुढारी

गोवा : दिशाभूल केल्याबद्दल स्मृती इराणींनी देशाची माफी मागावी

पणजी : पुढारी वृत्तसेवा : देशाची दिशाभूल केल्याबद्दल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी जनतेची माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

एटॉल ही कंपनी उग्रया मर्कंटाईल या कंपनीबरोबर भागीदारीत कार्यरत आहे. ज्याचे संचालक केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी आहेत. आसगाव (ता. बार्देश) येथील वादग्रस्त ‘सिली सोल्स कॅफे अँड बारचा जीएसटी क्रमांकदेखील एटॉलच्या नावावर आहे. तसेच अन्न आणि औषध परवानाही याच कंपनीच्या नावावर आहे. याचा अर्थ विविध कागदपत्रांच्या आधारे ‘सिली सोल्स कॅफे अँड बार स्मृती इराणी यांचे कुटुंबच चालविते हे स्पष्ट झाले आहे. त्या खोटारड्या आहेत हेही सिद्ध झाले आहे. त्यामुळे त्यांनी काँग्रेस नेते जयराम रमेश, पवन खेरा, नेट्टा डिसोझा यांच्याविरोधात न्यायालयात बदनामी केल्याचा आरोप मागे घेऊन त्यांचीही माफी मागावी.

ते म्हणाले की, कोणी बेकायदेशीर कामांमध्ये गुंतून कितीही निष्पाप असल्याचा आव आणला तरी माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीपासून सुटका करून घेऊ शकत नाही. मला खात्री आहे की निती, नियत आणि नेता यांच्याबद्दल बोलणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना नक्कीच मंत्रिमंडळातून काढून टाकतील.

Back to top button