गोवा : हणजूण येथील जमीन हडप करणार्‍या तिघांना अटक | पुढारी

गोवा : हणजूण येथील जमीन हडप करणार्‍या तिघांना अटक

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  बनावट विक्रीपत्र तयार करून हणजूण येथील जमीन हडप केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. राज्यातील जमिनी बनावट कागदपत्रे तयार करून हडप करणार्‍यांचा शोध घेण्यासाठी सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाने मंगळवारी ही कारवाई केली आहे. यातील दोघे कुंकळ्ळीतील तर एकजण शिवोलीतील आहे.

प्राप्त माहितीनुसार, राज्यातील जमिनी बनावट कागदपत्राच्या साहाय्याने हडप करणार्‍या विविध प्रकरणाचा तपास सध्या एसआयटी करत आहे. एसआयटीने घोघळ मडगाव येथील विक्रांत शेट्टी याची या प्रकरणी पहिली अटक केल्यानंतर आतापर्यंत 13 जणांना अशाच प्रकरणात अटक केली आहे. त्यातील 10 जन जामिनावर सुटलेले असले तरी त्यांची चौैकशी सुरू आहे. एसआयटीने मंगळवारी बनावट विक्रीपत्र तयार करणार्‍या तीन आरोपींना अटक केली. यात पॉलिना दिनीज , मारियानो टेलेस गोन्साल्विस आणि रॉयसन रॉड्रिगीज या़चा समावेश आहे.

या तिघांनी हणजूण येथील जमीन बनावट कागदपत्रे तयार करून व बनावट विक्रीपत्र तयार करून हडप केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. हणजूण गावातील जमिनी हडप करण्यासाठी वरील संशयितांनी बनावट कागदपत्रे सादर करून बनावट विक्रीपत्रे आणि उत्तराधिकारी डीड तयार केले. बार्देश मामलेतदारांनी वरील तिघाविरुद्ध एसआयटीकडे तक्रार केल्यानंतर एसआयटीने ही अटक केली आहे. याप्रकरणी यापूर्वी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, अटक झाली नव्हती. ती काल झाली आहे.

Back to top button