गोवा : मर्डीवाडा-मोरजी रस्त्याची चाळण | पुढारी

गोवा : मर्डीवाडा-मोरजी रस्त्याची चाळण

पेडणे; पुढारी वृत्तसेवा :  मोरजी पंचायत क्षेत्रातील मर्डीवाडा या मुख्य रस्त्याची खड्ड्यामुळे चाळण झाली आहे. कोको आर्ट गॅलरीजवळ भलामोठा खड्डा पडलेला आहे. या खड्ड्यांमधून अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम खाते रस्ता विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

मे महिन्यापासून या रस्त्यावर छोटा खड्डा पडला होता. मागच्या पंधरा दिवसापूर्वी या खड्ड्याच्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर स्थानिक नागरिक तथा माजी उपसरपंच अमित शेटगावकर यांनी पुढाकार घेऊन हा खड्डा बुजवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु सातत्याने धो धो पडत असलेल्या पावसामुळे हा खड्डा पुन्हा एकदा जीवघेणा ठरत आहे.

या खड्ड्याच्या बाजूलाच एक हॉटेल आहे आणि त्या ठिकाणी दिल्लीतील काही पर्यटक वास्तव्य करून असतात. ते आपली वाहने या रस्त्याच्या बाजूला ठेवत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण करत आहेत. खड्डा वाचवता वाचवता वाहनांनाही अपघात घडू शकतात. स्थानिक नागरिक सोनू शेटगावकर यांनी सांगितले की, शनिवारी रात्री झालेल्या वेगवेगळ्या अपघातात चारजण या खड्ड्यात पडून जखमी झाले. याकडे वाहतूक पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष होत आहे.

Back to top button