गोव्यात काँग्रेस आमदारांची लपाछपी; आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता | पुढारी

गोव्यात काँग्रेस आमदारांची लपाछपी; आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याची शक्‍यता

पणजी : पुढारी वृत्‍तसेवा : काँग्रेसच्या अकरापैकी आठ ते नऊ आमदार फुटून भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार अशी अफवा खरी होण्याची शक्‍यता आहे. काँग्रेसचे आमदार फुटू नयेत यासाठी काँग्रेसचे दिनेश गुंडु राव गोव्यात दाखल झाले आणि त्यांनी आज, रविवारी (दि.१० जुलै) मडगाव येथे काँग्रेसच्या आमदारांच्या दोन बैठका घेतल्या. त्यानंतर संध्याकाळी ६.३० वाजता काँग्रेस कार्यालयात सर्व आमदारांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. साडेसहा वाजता फक्त संकल्प आमोणकर व रुडाल्फ फर्नांडिस हे दोनच आमदार काँग्रेस कार्यालयात उपस्थित होते. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमिछ पाटकर हे मडगाव येथे आमदार दिगंबर कामत यांचे मन वळवण्यासाठी थांबले होते. मात्र दिगंबर कामत यांनी काँग्रेस पाटकर यांच्यासोबत पणजीला येणे टाळले.

आपण सध्या रिटायर हर्ट असल्याचे सांगून त्यांनी आपणाला विरोधी पक्षनेते पद न मिळाल्याची खंत पुन्हा एकदा व्यक्त केली. काँग्रेस कार्यालयात साडेसहा वाजता पत्रकार परिषद झाली नाही. त्यानंतर ७.१० ची वेळ देण्यात आली. त्यावेळीही सर्व आमदार पत्रकार परिषदेत उपस्थित राहिले नाहीत. विरोधी पक्षनेते मायकल लोबो आणि त्यांचे सहकारी आमदार केदार नाईक आणि राजेश फळदेसाई हे मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर पोहोचले. त्यामुळे आज रात्रीपर्यंत काँग्रेसचे काही आमदार भाजपमध्ये दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कालपासून काँग्रेसचे आमदार भाजपमध्ये दाखल होणार अशी चर्चा असतानाच आज काँग्रेसच्या आमदारांनी दिवसभर पक्षांतर करणार नसल्याचे वारंवार सांगितले. मात्र पत्रकार परिषदेसाठी लपाछपी केली. हे पाहिल्यानंतर कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे काँग्रेसच्या आमदारांचे समाधान करू शकले नाहीत. त्यांना समाधानकारक आश्वासन देऊ शकले नाहीत आणि त्यांचा प्रवेश रोखण्यात अपयशी ठरल्याची चर्चा सध्या सुरू असून कॉंग्रेसला खिंडार पडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

हेही वाचा 

Back to top button