Goa election : ...अखेर आपने केला विधानसभेत प्रवेश | पुढारी

Goa election : ...अखेर आपने केला विधानसभेत प्रवेश

पणजी : पिनाक कल्लोळी
2022 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला खाते उघडण्यात यश आले आहे. पक्षाचे बाणावलीचे उमेदवार व्हिन्सी व्हिएगस यांनी चर्चिल आलेमाव यांचा, तर वेळळीचे उमेदवार क्रुझ सिल्वा यांनी माजी मंत्री फिलिप नेरी यांना मागे टाकत विजय प्राप्त केला. 2017 साली पक्षाने याच दोन मतदारसंघात चांगली कामगिरी केली होती. या दोन आमदारांनी प्रामाणिकपणे काम केल्यास पक्षाला वाढीस संधी मिळणार आहे. 2017 च्या तुलनेत मतांच्या टक्केवारीत 0.5 टक्क्यांनी वाढ झाल्याने यंदा आपच्या निवडणूक रणनीतीला यश आले आहे. 2017 साली पक्षाच्या मतांची टक्केवारी 6.3 होती ती वाढून 6.8 झाली आहे.

2022 च्या निवडणुकीत आपने 39 जागांवर निवडणूक लढवली. आपचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार अमित पालेकर सांताक्रुझ मतदारसंघात तिसर्‍या स्थानी राहिले. पक्षाचे गोवा संयोजक राहुल म्हांबरे म्हापसामध्ये तिसर्‍या स्थानवरच राहिले. नावेलीमध्ये प्रतिमा कुतिन्हो पाचव्या स्थानावर राहिल्या. पर्येमध्ये विश्वजीत कृ. राणे दुसर्‍या स्थानावर असले तरी त्यांचा 13 हजारहून अधिक मतांनी पराभव झाला. शिरोडामध्ये महादेव नाईक हे दुसर्‍या स्थानावर राहिले. कुडतरीमध्ये डॉमनिक गावकर दुसर्‍या, तर कुठ्ठाळीमध्ये अ‍ॅलिना सालढाणा सातव्या स्थानी राहिल्या.

आम आदमी पक्षाने 2022 ची निवडणूक खूपच गंभीरपणे घेतली होती. त्यांनी ही निवडणूक सर्वशक्‍ती निशी लढवली. राज्यभर विविध मुद्यांवर केलेली आंदोलने, पक्षात दाखल झालेले विविध स्तरातील लोक, मोफत हमींचे आश्वासन, अरविंद केजरीवाल यांच्या जाहीर सभा, घरोघरी प्रचार करून केलेली दिल्ली मॉडेलची जाहिरात या सर्व घटकांचा फायदा होऊन यावेळीच्या विधानसभेत आपला खाते खोलण्यास मदत झाली आहे. यंदाच्या निवडणुकीत पक्षाला राज्यभरातून एकूण 63,601 मते मिळाली आहेत. पक्षाच्या तुलनेत विचार केल्यास आप राज्यात चौथ्या स्थानावर आहे.

2017 च्या पराभवानंतर आपने पक्षीय पातळीवर अनेक बदल केले होते. नव्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांना पक्षाने संधी दिली. विविध स्तरातील कार्यकर्त्यांना, नेत्यांना पक्षात स्थान देण्यात आले. यामुळे 2017 साली विशिष्ट उच्च वर्गीय लोकांचा पक्ष समजला जाणार्‍या आपची प्रतिमा बदलली. 2022 च्या निवडणुकीत पक्षाची प्रतिमा खरोखर आम आदमीचा पक्ष अशी झाली. पक्षातर्फे सहा मोफत हमींची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये समाजातील सर्व घटकांना विविध योजना देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते. निवडणुकीच्या सुरूवातीच्या काळात आपला या घोषणांचा फायदा झाला. मात्र, पक्षाने भंडारी समाजाचा मुख्यमंत्री आणि ख्रिस्ती समाजाचा उपमुख्यमंत्री करणार असे जाहीर केल्यावर पक्षाविषयी काहीशी नकारात्मक वातावरण तयार झाले. एकूणच आरंभ चांगला झाला तरी अंतिम टप्प्यात किंचित कमी पडल्याने 2022 मध्ये आपला दोनच जागांवर यश आले.

Back to top button