गाेवा राज्यात धुवाधार पावसाने जबरदस्त तडाखा

गाेवा राज्यात धुवाधार पावसाने जबरदस्त तडाखा

पणजी/म्हापसा/मडगाव/डिचोली/पेडणे ; पुढारी वृत्तसेवा : गाेवा राज्यात धुवाधार पावसाने जबरदस्त तडाखा दिला. गेल्या बुधवारपासून पाऊस कोसळत आहे. गुरुवारी तर कहर झाला. रात्रभर पाऊस अविश्रांत कोसळत होता. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. कमालीचे गारठले. बससेवा विस्कळीत झाली.

रेल्वेसेवेवरही परिणाम झाला. काही रेल्वेगाड्या रद्द केल्या. काही गाड्यांचे मार्ग बदलले. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. काही ठिकाणी घरांची पडझड झाली. नद्यांना पूर आला आहे. त्यांचा प्रवास धोक्याच्या दिशेने सुरू आहे. सत्तरी तालुक्यातील आठ गावांचा संपर्क वाळपईपासून तुटला आहे.

गुरुवारी ठिकठिकाणी गार वार्‍यासह सलग जोरदार पावसाने हजेरी लावली. काही भागात दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच होती. वाळपई येथे 24 तासात सर्वाधिक 2 इंच पाऊस पडला. सत्तरी तालुक्यातील काही गावांचा वाळपई शहरापासून संपर्क तुटला आहे.

गाेवा राज्यात आज 23 व 24 रोजी 45 ते 65 किलोमीटर प्रतितास वेगाने वार्‍यासह दमदार पावसाची शक्यता असल्याने वेधशाळेने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. राज्यात पावसाने आतापर्यंत 80 इंचांचा पल्ला गाठला आहे.

गोमंतकीयांना हा आठवडाभर सूर्यदर्शन झालेले नाही. वेधशाळेने गुरुवारी अचानक पावसाचा रेड अ‍ॅलर्ट जारी केला. गुरुवारी दुपारपर्यंत गाेवा राज्यात 28.7 मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली होती.

संख्यात्मक हवामान अंदाजाने दिलेल्या संकेतानुसार 25 जुलैपासून राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता आहे. 1 जून ते 22 जुलै या कालावधीत सरासरी 65 इंच इतका पाऊस पडतो.

राज्यात पावसाने आतापर्यंत 80 इंचांचा पल्ला गाठला आहे. त्यामुळे आतापर्यंत पडलेला पाऊस सरासरीच्या तुलनेत 22 टक्के जास्तच आहे. पेडण्यात तब्बल 110 इंच पावसाची नोंद झाली आहे.

सलग पडत असलेल्या पावसामुळे तापमानात मोठी घट झाली आहे. वेधशाळेच्या आकडेवारीनुसार, पणजीत कमाल तापमान 26.2 अंश व किमान 24.7 अंश सेल्सिअस इतके नोंद झाले होते. तर मुरगावात कमाल 28.4 व किमान 24.6 अंश सेल्सिअस नोंद झाले होते. पावसामुळे हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला आहे. पुढील 24 तासात तापमान 24 अंश ते 27 अंशांपर्यंत कायम असेल.
समुद्र खवळलेला

समुद्रात 50 ते 60 किलोमीटर प्रतितास वेगाने वादळी वारे वाहत असल्याने समुद्र खवळलेला आहे. 2.8 ते 4.8 मीटर उंचीच्या लाटा उसळत आहेत. मच्छीमारांना पुढील 5 दिवस समुद्रात न जाण्याचा इशारा कायम आहे.

म्हणून गोवा, मुंबई व पश्‍चिम घाटात मुसळधार :

बंगाल उपसागर व आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे गोवा, मुंबई व पश्‍चिम घाटात मुसळधार पाऊस कायम आहे. दक्षिण गुजरात किनारपट्टी ते उत्तर केरळ किनारपट्टीवर ऑफ शोअर ट्रफ प्रणाली निर्माण झाली आहे. सलग व पावसाच्या वाढत्या जोरामुळे भूस्खलनासाठी असुरक्षित असलेल्या क्षेत्रांवर देखरेख ठेवली जात आहे. नद्यांच्या पाण्याच्या पातळीवरही लक्ष ठेवले जात आहे.

मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील जनशताब्दी स्पेशल, मुंबई ते करमाळी व करमळी ते मुंबई जाणार्‍या तेजस विशेष गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय दोन गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

कोकण रेल्वेच्या सात ट्रेन रद्द

काल दिवसभरात पडलेल्या धुवाधार पावसामुळे कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे सेवा विस्कळीत झाली. चिपळूण आणि कामठे रेल्वे थांब्यामधील वशिष्ठी नदीला पूर आल्याने येथे असलेल्या पूल पाण्याखाली गेला.

कोकण रेल्वे मार्गावरील जनशताब्दी स्पेशल, मुंबई ते करमळी व करमळी ते मुंबई जाणार्‍या तेजस, मत्स्यगंधा, मुंबई-मंगळूर, दादर-तिरूनेलवेल्‍ली तसेच कोकणकन्या एक्स्प्रेस, तुतारी या सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय 4 गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

या गावांचा तुटला संपर्क

वाळपई, साखळी, म्हापसा, सांगे, पणजीसह विविध ठिकाणी दिवसभर पाऊस कोसळला. सत्तरीतील सोनाळ, धारखण, कुडसे, सावर्शे, गांजे, खडकी, गुळेली, धावशे या 8 गावांचा वाळपई शहरापासून संपर्क तुटला आहे.

दक्षिण गोव्यात कुशावती नदीला पूर आल्याने चार दिवसात सलग दुसर्‍यांदा पारोडा गाव पाण्यात बुडाले असून खांडेपार नदीचे पाणी रस्त्यावर येऊन दाभाळ आणि माट्टीधाड या गावांचा निरंकाल गावाशी संपर्क तुटला आहे.

आंतरराज्य बससेवा सुरू

कदंब वाहतूक महामंडळाची महाराष्ट्रातील बससेवा कोरोनामुळे बंद असून, ती अद्याप बंदच आहे. त्यामुळे पावसाचा त्यावर काही परिणाम होण्याचा प्रश्‍न नाही. कर्नाटकातील हुबळी, बेळगाव व कारवार येथील दहा फेर्‍या कंदब बसेसच्या होत आहेत.

या सेवेवर पावसाचा काही परिणाम झाला नाही. त्याशिवाय राज्यात 170 बसेस सेवेत असल्याची माहिती महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांकडून पूरस्थितीचा आढावा

डिचोली : डिचोली तालुका तसेच राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाने उद्भवलेल्या पूर सद‍ृश स्थितीचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी सायंकाळी आढावा घेतला. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी यांच्याशी आपत्कालीन नियंत्रण व उपाययोजना याबाबत त्यांनी सूचना दिल्या.

तातडीने आवश्यक मदत करा, तसेच जिथे पुराचा धोका निर्माण होऊ शकतो त्याठिकाणी यंत्रणा सज्ज ठेवणे, जादा मनुष्यबळ व इतर मदतीची सर्व ती खबरदारी घेण्याचे आदेश दिले. लोकांनी सर्व ती खबरदारी व काळजी घेण्याचे आवाहनही डॉ.सावंत यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news