उन्हाळ्यात घ्या पायांची काळजी | पुढारी

उन्हाळ्यात घ्या पायांची काळजी

घाम येणे ही उन्हाळ्याच्या दिवसांत सर्वात प्रमुख समस्या असते; कारण हानिकारक जीवजंतू घामामध्ये दडलेले असतात. ते नियमितपणे रोज धुऊन स्वच्छ केले तरंच घामाची दुर्गंधी दूर होते आणि आपल्याला स्वच्छ, ताजेतवाने वाटते. पायावरही अनेक जीवजंतू जमा होतात आणि त्यामुळे दुर्गंधी निर्माण होऊ शकते. म्हणून आंघोळ करतानाही पायाकडे विशेष लक्ष द्यावे. पाय स्वच्छ धुतल्यानंतर ते चांगले पुसून घ्यावेत. कोरडे झाल्यानंतर त्यावर टाल्कम पावडर लावावी.

उन्हाळ्यात सिल्पर आणि ओपन सँडल्स अधिक उत्तम ठरतात. कारण, यामुळे पायांना हवा मिळते आणि घामही सुकतो. मात्र, ओपन फुटवेअरमुळे पायांवर जास्त धूळ बसते. अशावेळी पायाची स्वच्छता महत्त्वाची ठरते. उकाड्याचा दिवस संपल्यानंतर संध्याकाळी पाय गार पाण्यात बुडवावेत. यामध्ये थोडेसे मीठ मिसळावे, यामुळे पायांवरची सर्व धूळ जाते आणि पायांना आरामही मिळतो. ‘एथलिस्ट फूट’ ही उन्हाळ्यातील, उकाड्याच्या ऋतूतील सर्वसामान्य समस्या असून, ती कोरड्या त्वचेवर निर्माण होते. या समस्येकड दुर्लक्ष केले तर भरपूर खाज सुटते, त्यासोबतच मोेठी समस्या निर्माण होऊ शकते. या त्रासाची सुरुवात फंगसच्या संक्रमणामुळे होते. म्हणूनच पायांमध्ये कोरडेपणा दिसून आला, तर पायाच्या पंजांमध्ये खाज येत असल्यास उशीर न करता त्वचारोग तज्ज्ञांकडे जाणे.

यावर अँटिफंगल प्रिपरेशन हा उपाय फायदेशीर ठरू शकतो. अतिरिक्त मॉईश्चराइजर, जास्त घाम, घट्ट बूट, दमट हवा या सर्व गोष्टी जीवाणूंच्या वाढीसाठी पूरक ठरतात. म्हणूनच दीर्घकाळ मोजे घालणे या दिवसात टाळावे. त्याऐवजी उघडे बूट घालावेत. तसेच आठवड्यातून एकदा पॅडिक्युअर करून पाय आणि नखे साफ करून घ्यावेत, यामुळे फंगल इन्फेक्शनपासूनही बचाव होतो. अशाप्रकारे उन्हाळ्याच्या दिवसांत आपण पायांची काळजी घेऊ शकतो.

संबंधित बातम्या
Back to top button