शेवगाव शहरात बारा ठिकाणी चोर्‍या | पुढारी

शेवगाव शहरात बारा ठिकाणी चोर्‍या

शेवगाव : पुढारी वृत्तसेवा

शेवगाव शहरात एकाच रात्री दहा ते बारा ठिकाणी चोर्‍या झाल्या.  काही ठिकाणाहून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली. एक दुचाकी वाहन चोरून नेण्यात आले. या चोर्‍यांमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

शहरात गुरुवारी पहाटे ज्ञानेश्वरनगर, पवार वस्ती व लांडे वस्तीवर दहा ते बारा ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला. यामध्ये चार ठिकाणी दागिने, रोख रक्कम व महागडया वस्तू चोरांनी लंपास केल्या.  शाम मनोहर तानवडे (रा. पिंगेवाडी ता. शेवगाव )यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी  चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. 

शहरातील लांडे वस्तीवरील भूषण युवराज लांडे यांच्या घरातील सोन्याची चैन, रिंगा, जोडवे व इतर महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरट्यांनी लंपास केली. शेजारीच झोपेत असलेले पद्माकर लांडे यांच्या खिशातील रोख रक्कम चोरट्यांनी चोरली. अमोल नाथा कर्डक    (रा. जीत हॉटेल शेजारी, नेवासा रोड शेवगाव) यांच्या घरासमोरून (एम.एच.16 बी.एक्स 0672) या दुचाकीचा लॉक तोडून चोरट्यांनी ती पसार केली. शाम मनोहर तानवडे यांच्या रुमचे कुलूप तोडून दीड लाख रुपये किंमतीचा कॅमेरा चोरला.  इतर साहित्याची उचकापाचक करून ती बाहेर अस्ताव्यस्त फेकून दिली. तर अमित नारायण चेके, सोपान लोंढे व सुभाष उत्तम लांडे  (सर्व रा. ज्ञानेश्वर नगर) तसेच ईश्वरसिंग राजपूत (रा. लांडे वस्ती रोड), शिवाजी बाळासाहेब देशमुख व रवि देवराव लांडे (दोघे रा. पवार वस्ती) यांच्या घराची कुलूप तोडून घरातील कपाटाची व साहित्याची उचकापाचक केली. मात्र, घरातील व शेजारील ग्रामस्थ जागे झाल्याने चोरट्यांनी तेथून पळ काढला. तसेच जयप्रकाश रावसाहेब लांडे व नितीन माधवराव लांडे (रा. बॉम्बे पेट्रोल पंपासमोर नेवासा रोड शेवगाव) यांच्या दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे लॉक न तुटल्याने चोरीचा प्रयत्न फसला. 

या चोर्‍यांचा प्रयत्न करीत असताना ईश्वरसिंग राजपूत यांच्या शिवम किराणा दुकानाचे कुलूप तोडतांना सहा जण सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोलिस नाईक सुधाकर दराडे, पो.कॉ.कैलास राठोड यांनी पंचनामे केले. पुढील तपास पोलिस नाईक सुधाकर दराडे करीत आहेत. या घटनेमुळे नागरिकांत भितीचे वातावरण पसरले.

Back to top button