बी.टी आणि बोंडअळी | पुढारी

बी.टी आणि बोंडअळी

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे पिकांच्या होणार्‍या नुकसानीच्या बातम्या आपण नेहमीच ऐकत असतो. बोंडअळ्यांच्या व्यवस्थापनासाठी बीटी तंत्रज्ञान तयार करण्यात आले. या तंत्रामुळे कापसाच्या उत्पादनात सर्वसाधारणपणे 25 ते 30 टक्के वाढ झाली आहे. बोंडअळी च्या नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापरही कमी झाला आहे. काय आहे तंत्रज्ञान?

बोंडअळी आणि बी.टी. तंत्रज्ञान

बोंडअळ्यांमुळे कापूस पिकाच्या उत्पादनात सुमारे 50 ते 80 टक्क्यांपर्यंत घट येते. या अळ्यांच्या नियंत्रणासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांची कीटकनाशके वापरली जातात. हे टाळण्यासाठी बी.टी. तंत्र विकसित करण्यात आले. खरे तर गेल्या काही वर्षांपासून शेतकरी बी.टी. तंत्राने विकसित करण्यात आलेले कपाशीचे बियाणे वापरत आहेत. मात्र, त्यामागील तंत्र अनेकांना ठाऊक नाही. या नवीन तंत्रज्ञानात बॅसिलस थुरीनजिअन्सिस हे पतंगवर्गीय अळ्यांना मारक ठरणारे गुणधर्म असलेले जनुक कपाशीमध्ये प्रत्यारोपिक करण्यात आले. अमेरिकेतील मोन्सॅन्टो या कंपनीने प्रथम या तंत्रज्ञानाचा अवलंब सन 1996 मध्ये भारतात करून बोंडअळी प्रतिकारक्षम बोलगार्ड या कापसाची निर्मिती केली आहे.

बी.टी. (बॅसिलस थुरीनजिअसीस)

थोडक्यात बी.टी. म्हणजे बॅसिलस थुरीनजिअसीस हे जमिनीत आढळणारे जीवाणू आहेत. हे जीवाणू स्फटिकरूपी प्रथिने तयार करतात. हे प्रथिने कार्यक्षम होण्यासाठी दोन टप्पे असतात, ते म्हणजे विरघळणे आणि प्रथिने कार्यरत होणे. प्रथिने विरघळण्यासाठी विम्ल माध्यम जरूरीचे असते, की जे बोंडअळ्यांच्या जठराच्या आत निसर्गतः असते. अळीच्या जठरामध्ये या प्रथिनांचे विघटन होऊन डेल्टा एन्डोटॉक्सिन तयार होते, त्यामुळे बी.टी.युक्‍त कपाशीच्या झाडाचे भाग अळीने खाल्ल्यानंतर अळीची अन्‍ननलिका सुजते आणि अळीचे खाणे बंद होते. नंतर दोन ते तीन दिवसांत अळी मरते. बी.टी. तंत्रामध्ये हे तत्त्व आहे, मात्र शेतकर्‍यांमध्ये बी.टी.बद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यासंदर्भात कृषितज्ज्ञांकडून वेळोवेळी माहिती दिली गेली आहे. त्यानुसार

प्रथमदर्शनी बी.टी. आणि बिगर बी.टी. झाडामध्ये फरक जाणवत नाही. बी.टी. तंत्रामुळे कापूस वाणांची उत्पादन क्षमता वाढत नाही. मात्र, उगवून आलेले झाड बोंड अळ्यांना प्रतिकारक्षम असल्याने बोंडअळीमुळे होणारी पातेगळ, फुलगळ आणि बोंडगळ थांबते. सस्तन प्राणी आणि पक्षी यांना हानी पोहोचत नाही. बोंडअळीमुळे होणारा रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि पर्यायाने फवारणीच्या खर्चातही बचत होते. मात्र, बी.टी.चे गुणधर्म त्या झाडामध्ये 90 ते 100 दिवसांपर्यत राहतात. त्यानंतर आवश्यकता भासल्यास फवारणी करावी लागते. तसेच बी.टी. वाणांचा रसशोषक करणार्‍या किडींवर काहीही परिणाम होत नाही म्हणून बी.टी. कापूस वाणावर येणार्‍या रसशोषक किडींचा बंदोबस्त करण्याची गरज भासते. कालांतराने बी.टी. वाणांना दाद न देणार्‍या बोंडअळ्यांचा प्रजाती निर्माण होऊ शकतात, हे टाळण्यासाठी बी.टी. वाण लावतांना 80 टक्के क्षेत्र बी.टी. वाणाचे आणि त्याभोवती 20 टक्के क्षेत्र हे बी.टी. विरहीत वाणाचे असावे. जेणेकरून बोंडअळ्यांमध्ये बी.टी. तंत्राविरुद्ध प्रतिकारशक्‍ती निर्माण होण्याचा काळ लांबेल. यासाठी बी.टी. कापूस पिकाभोवती 5 साध्या कपाशीच्या ओळी चारही बाजूने लावणे भारत सरकाने बंधनकारक केले आहे. असे असले तरी बीटीमुळे काही नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. कापसावर आता नवीन कीडी, दुय्यम कीडी आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.

– सतीश जाधव

हेही वाचा;

 

Back to top button