जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता टिकवण्यासाठी करा सेंद्रिय खतांचा वापर | पुढारी

जमिनीची सुपिकता आणि उत्पादकता टिकवण्यासाठी करा सेंद्रिय खतांचा वापर

पर्याय सेंद्रिय खतांचाभारताची वाढती लोकसंख्या पाहता, अन्‍नधान्याची गरज भागवणे कठीण आहे. म्हणून भारतात शेती उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा जास्तीत जास्त वापर केला जातो. परंतु, दिवसेंदिवस सुपिकता व उत्पादकता कमी होत आहे. म्हणून जमिनीची सुपिकता व उत्पादकता टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा शेतीत वापर होणे गरजेचे आहे.

सेंद्रिय खतांमधील घटक

सेंद्रिय खतांसाठी लागणारे घटक सहज उपलब्ध होऊ शकतात, त्यामुळे रासायनिक खतांवर होणारा खर्च कमी होतो. सेंद्रिय खतांमध्ये कुजलेल्या वनस्पती, प्राण्यांचे मलमूत्र व त्यांचे अवशेष, मृत व जीवित सूक्ष्मजीव इ. असतात. या सर्व घटकांचे विघटन होते व त्यापासून पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारे अन्‍नद्रव्य तयार होतात. तसेच सेंद्रिय खते जमिनीत असलेली अविद्राव्य अन्‍नद्रव्ये विद्राव्य अवस्थेत रूपांतर करून पिकांसाठी उपलब्ध करून देतात. सेंद्रिय खतांमुळे हानिकारक रसायनांच्या अवशेषांचे विघटन करून पिकांना होणार्‍या हानीपासून वाचवतात. सेंद्रिय खते मातीचे भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म नियंत्रित करतात व पिकांना आवश्यक व पोषक असणार्‍या प्रमाणात स्थिर करतात.

सेंद्रिय खतांमुळे होणार्‍या सुधारणा

1) जमिनीचा सामू नियंत्रित होतो. 2) क्षारता कमी होते. 3) उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश पिकांसाठी उपलब्ध होतात. 4) सूक्ष्म अन्‍नद्रव्ये लोह, मंगल, जस्त, तांबे इ. पिकांसाठी उपलब्ध होण्यास मदत होते. 5) हवेतील नत्राचे जमिनीत स्थिरीकरण होते. 6) सेंद्रिय खते जमिनीतील पिकांसाठी आवश्यक असणारे अन्‍नद्रव्य धरून ठेवतात व कालांतराने पिकांना उपलब्ध करून देतात.7) सेंद्रिय खते जमिनीतील स्थिर स्फुरद विरघळण्यास मदत करतात.

सेंद्रिय खतांमुळे मातीच्या भौतिक गुणधर्मांत होणार्‍या सुधारणा 

  • जमिनीची पोत व संरचना सुधारते.
  • जमिनीची जलधारण क्षमता वाढते.
  • जमिनीची जलवाहकता वाढते.
  • मातीची घनता कमी होते आणि जमिनीत हवा, पाण्याचे प्रमाण नियंत्रित राहते.
  • जमिनीत पाणी मुरण्याचे प्रमाण वाढते.
  • पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.

जैविक गुणधर्मात सुधारणा

1) सेंद्रिय खतांमुळे मातीच्या जैविक गुणधर्मात वाढ होण्यास मदत होते. 2) सेंद्रिय खतांतील सेंद्रिय कर्ब हा घटक जमिनीतील उपयोगी सूक्ष्मजीवांसाठी ऊर्जेचा स्त्रोत म्हणून काम करतो. 3) जमिनीत उपयोगी सूक्ष्म जीवांची संख्या वाढते. 4) सेंद्रिय खत जमिनीतील सूक्ष्म जीवांच्या साहाय्याने नत्राचे स्थिरीकरण व स्फुरद विद्राव्यीकरण करण्याचे महत्त्वाचे कार्य करते. 5) सेंद्रिय खतांचे सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने जमिनीत विघटन होताना प्रथिने, जीवनसत्त्वे, प्रतिजैविके, विकर, वाढ संप्रेरके इ. तयार होतात. व त्याच्या पिकांच्या वाढीसाठी व उत्पन्न वाढीसाठी उपयोग होतो. 6) जमिनीत पी.एस.बी. (स्फुरद विरघळवणारे जीवाणू), अ‍ॅझेटोबॅक्टर, रायझोबिअम, अ‍ॅझोस्पिरिलिअम इ. उपयोगी जीवाणूंची वाए करण्यास सेंद्रिय खते मदत करतात.

– विलास कदम

हेही वाचा ;

Back to top button