केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी नागपुरात दिला शेतकऱ्यांना सल्ला… | पुढारी

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी नागपुरात दिला शेतकऱ्यांना सल्ला...

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ‘शेती क्षेत्रात असंतुलन आहे, ते संतुलित करण्यासाठी पीक वैविध्यिकरण, तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, असा सल्ला केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकऱ्यांना नागपुरात दिला.

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असा नावलौकीक असलेल्या ‘ॲग्रोव्हिजन’ या चार दिवसीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन तोमर यांच्या हस्ते कविवर्य सुरेश भट सभागृहात झाले. त्यावेळी ते बोलत होते, याप्रसंगी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तर प्रमुख अतिथी म्हणून कृषी मंत्रालयाचे सचिव संजीव अग्रवाल , कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्री अश्वथनारायण सी. उपस्थित होते.

रेशीमबाग मैदानात २४ ते २७ डिसेंबर दरम्यान आयोजित या चार दिवसीय कृषी प्रदर्शनात ३५० दालने, कृषी प्रदर्शनाचे ६ दालन तसेच कृषी कार्यशाळेचे २ दालन राहणार असून या वर्षीच्या कृषी प्रदर्शनाची संकल्पना ‘समृद्ध शेतीसाठी नवे तंत्रज्ञान’ अशी आहे. या प्रदर्शनात, विदर्भात डेअरी उद्योगाचा विकास, गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान आणि मूल्यवर्धन राष्ट्रीय अशा विविध विषयावर परिसंवाद तसेच परिषद होणार आहे. शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा, दुग्धव्यवसाय विकास परिषद तसंच राष्ट्रीय कृषी प्रदर्शन सुद्धा या चार दिवसीय प्रदर्शनामध्ये होईल.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र तोमर  म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाने पामतेल अभियानाला मान्यता दिल्यानंतर ईशान्य भारतातील नऊ लाख हेक्‍टर जमिनीवर त्याची लागवड होत आहे. यामुळे ईशान्य भारताचे सशक्तीकरण सोबतच खाद्यतेलाची गरज सुद्धा पूर्ण होत आहे. कृषीच्या क्षेत्रात खासगी क्षेत्राच्या गुंतवणुकीची आवश्यकता असल्याचे तोमर यांनी यावेळी नमूद केले. सध्या कृषी क्षेत्रामध्ये शासकीय खरेदी ,खत बियाणे कीटकनाशकं साठी अनुदान अशा सर्व शासकीय योजनांचा निधी समाविष्ट आहे. कृषी क्षेत्रांमध्ये संरचनात्मक निधीसाठी एक लाख कोटी रुपयाचा निधी आत्मनिर्भर पॅकेज अंतर्गत केंद्र सरकारने मंजूर केला होता. या अंतर्गत आता गावस्तरावर सुद्धा वेअर हाऊस, शीतसाखळी यासारख्या सुविधा निर्माण होत असून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

नितीन गडकरी म्हणाले, ‘पेट्रोलियम तसेच इंधन यावर आयातीचा खर्च हा १० हजार कोटींच्या वर असून याला पर्याय म्हणून पर्यावरण सक्षम, किफायतशीर असे बायोइथेनॉलची गरज असल्याची नितीन गडकरी यांनी सांगितले. यापुढे पेट्रोलवर चालणाऱ्या सर्व कार गाड्यांमध्ये फ्लेक्स इंजिनची सुविधा राहणार असून यामुळे वाहनांची किंमत बदलणार नाही. शंभर टक्के बायोइथेनॉल वर चालणाऱ्या गाड्यांमुळे शेतकऱ्यांना ईथेनॉलची पंप टाकण्याची संधी मिळणार आहे.

कर्नाटकचे माहिती तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण मंत्री अश्वथनारायण सी. यांनी शेतक-यांमध्ये जनजागृती तसेच शेतीच्या प्रगतीसाठी प्रगत तंत्रज्ञान तसेच सर्वोत्कृष्ठ उपक्रम यांची गरज असल्याचे सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button