लिंबू पिकाचे कीड नियंत्रण | पुढारी

लिंबू पिकाचे कीड नियंत्रण

लिंबापासून शेतकर्‍याला चांगले उत्पन्न मिळू शकते हे सिद्ध झाले आहे. हमखास उत्पन्नाचा मार्ग म्हणून लिंबाच्या लागवडीकडे पाहिले पाहिजे. लिंबू (Lemon) हे छोटेसे फळ अनेक औषधी गुणांनी युक्त आहे. लिंबाची मागणी दिवसेंदिवस वाढतच जाणार आहे. त्यामुळे या पिकाच्या लागवडीतून चांगले उत्पन्न मिळू शकते याची जाणीव शेतकर्‍यांनी ठेवावी.

लिंबू हे तिन्ही हंगामांत घेतले जाणारे फळ पीक आहे. लिंबाच्या लागवडीत आंबे बहर हा सर्वाधिक महत्त्वाचा समजला जातो. लिंबाच्या लागवडीपासून चांगले उत्पन्न मिळवायचे असेल तर शेतकर्‍यांना या पिकावर कोणतीही रोगराई आणि कीड पसरू नये याची दक्षता घेणे आवश्यक असते. ही काळजी घेतली तर या पिकापासून भरघोस उत्पन्न मिळू शकते. लिंबाच्या बागेत शेतकर्‍यांनी कायम स्वच्छता राखणे आवश्यक असते. लिंबावर वेगवेगळ्या प्रकारची कीड पडत असते.

या किडीमुळे फळाची गुणवत्ता कमी होते. त्याचबरोबर उत्पादनही कमी होते. कीड आणि रोगराईच्या प्रादुर्भावाची लक्षणे जाणून घेऊन त्याप्रमाणे उपाय केले तर कीड आणि रोगराई वेळेत नियंत्रणात येते. लिंबावर हिरव्या रंगाची फुलपाखरू नामक अळी येत असते. ही अळी झाडाची कोवळी पाने कुरतडून खाते. त्याचबरोबर नागअळी, काळी माशी, पांढरी माशी, सायला यांसारख्या अळ्या लिंबाच्या फळावर पडतात.

या अळ्यांमुळे फळे अकाली गळून पडतात. लहान फळेही गळून पडतात. परिणामी आपले उत्पादन कमी होते. या रोगराईसाठी आणि किडीच्या नियंत्रणासाठी तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करणे आवश्यक असते. फेब्रुवारीमध्ये लिंबाच्या खोडाला बोरीक पेस्ट लावावी लागते. लागवड केल्यापासून तीन ते चार वर्षांपर्यंत फेब्रुवारी, जून, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये निंबोळी अर्क पाण्यात मिसळून दोन-तीन वेळा फवारावा लागतो. त्याखेरीज ट्रायझोफॉर्मची फवारणीही करावी लागते.

पिठ्या ढेकूण नावाची कीड नियंत्रणात आणण्यासाठी क्रिप्टोलिमस माँट्रोझिअरीचे चार-पाच भुंगेरे झाडावर सोडावेत. त्याचबरोबर व्हर्टीसिलिअम दोन ते चार ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून झाडावर फवारणी करावी. सूर्य मावळल्यानंतर बागेत धूर करावा. झाडावर पडणार्‍या पतंगांच्या नियंत्रणाकरिता गूळ, व्हिनेगर, मेलॅथिऑन यांचे द्रावण बाटलीत घालून झाडावर बांधावे. अशी उपाययोजना केली तर लिंबावर पडणारे रोग आणि कीड यांचा वेळीच बंदोबस्त होऊ शकतो. त्याकरिता शेतकर्‍याने डोळ्यात तेल घालून झाडांवर एखाद्या रोगराईचा प्रादुर्भाव तर झालेला नाही ना, हे सतत तपासले पाहिजे.

– सतीश जाधव

Back to top button