निगराणी ज्वारी आणि बाजरीची | पुढारी

निगराणी ज्वारी आणि बाजरीची

ज्वारी, बाजरी ही महत्त्वाची तृणधान्याची पिके आहेत. त्यांची काळजी विशेष निगुतीने घेणे आवश्यक आहे. कृषी उत्पादन वाढवणे, प्रतिहेक्टरी पिकाची उत्पादकता वाढवणे, त्यांची गुणवत्ता वाढवून स्पर्धात्मक किमतीने शेतमाल देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये उतरवणे हे पुढील काळाचे कृषी व्यवस्थापनाचे सूत्र ठरणार आहे. उत्पादकता आणि नफा साध्य करत असताना जमिनीची प्रत, तिचे आरोग्य, जमीन, पाणी आणि हवामान यांचे प्रदूषण होणार नाही आणि विकास हा शाश्‍वत स्वरूपाचा राहील, याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याद‍ृष्टीने या पिकांची काळजी कशा रितीने घेतली पाहिजे, हे समजून घेणे आवश्यक आहे.

ज्वारीच्या लागवडीसाठी चांगला निचरा आणि 5.5 ते 8.5 सामू असलेली चिकण पोयट्याची मध्यम ते काळी जमीन निवडावी. लागवड करताना त्याची पूर्वमशागत कशी करावी, हे समजून घेणे आवश्यक आहे. जमिनीची 15 ते 20 सें.मी. खोल नांगरट करून 2 ते 3 वखराच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या पाळीपूर्वी 10 ते 12 टन प्रतिहेक्टरी शेणखत जमिनीत मिसळावे. पेरणीसाठी हेक्टरी 10 किलो बियाणे वापरावे. बियाणे हे बीजप्रक्रिया केलेले वापरावे. यासाठी 1 किलो बियाण्यास 4 ग्रॅम गंधकाची भुकटी चोळावी. त्यामुळे पुढे कोणताही रोग येणार नाही. पट्टा पद्धतीने हे आंतरपीक 2:1 या प्रमाणात घ्यावे. मूग, उडीद आणि चवळी ही आंतरपिके म्हणून घेता येतात. ज्वारीस प्रामुख्याने खोडमाशी आणि खोडकिडींचा प्रादुर्भाव जास्त होतो.

बाजरी पिकाच्या अधिक उत्पादनासाठी संकरित आणि सुधारित वाणांचा वापर, पेरणीचा योग्य कालावधी, हेक्टरी रोपांची संख्या, आंतरमशागत, पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी व्यवस्थापन आणि वेळीच पीकसंरक्षण इत्यादी तंत्राचा वापर करावा. बाजरीसाठी उत्तम निचरा होणारी आणि 6.2 ते 8.0 सामू असलेली मध्यम ते भारी जमीन निवडावी. हलक्या जमिनीवर सरी-वरंबा पद्धतीचा अवलंब करावा. जमिनीची 15 सें. मी. खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या 2 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या अगोदर हेक्टरी 5 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरवून टाकावे. पेरणीसाठी हेक्टरी 3 ते 4 किलो बियाणे वापरावे. अरगट रोगाच्या बंदोबस्तासाठी 20 टक्के मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी. त्यासाठी 10 लि. पाण्यात, 2 कि. मीठ विरघळावे. बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

पेरणी सरी-वरंबा पद्धतीने करावी. पेरणीसाठी बाजरी पिकाच्या 2 ओळीतील अंतर 45 सें. मी. आणि 2 रोपांतील अंतर 15 सें.मी. ठेवल्यास हेक्टरी सुमारे 1.50 लाख रोपांची संख्या ठेवता येते. नियमित पाऊस पडणार्‍या भागात किंवा ज्या ठिकाणी पाण्याची सोय असेल अशा ठिकाणी 2 ओळीतील अंतर 30 सें.मी. आणि 2 रोपातील अंतर 15 सें. मी. ठेवावे. त्यामुळे हेक्टरी 2.22 लाख इतकी झाडांची संख्या राखली जाईल. मध्यम जमिनीत बाजरी+ तूर (2:1) पेरणी 2 ओळीत 30 से.मी. अंतरावर करावी. बाजरीच्या 2 ओळीनंतर 1 ओळ पेरावी. हलक्या जमिनीत बाजरी+ मटकी (2:1) पेरणी 2 ओळीत 30 सें.मी. अंतरावर करावी. बाजरीच्या 2 ओळींनंतर मटकीची 1 ओळ पेरावी. मध्यम जमिनीकरिता प्रतिहेक्टर 50 कि. नत्र, 25 किलो स्फुरद आणि 20 किलो पालाशची मात्रा द्यावी. हलक्या जमिनीकरिता प्रति हेक्टर 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 20 कि. पालाश द्यावे. हेक्टरी रोपांची योग्य संख्या योग्य प्रमाणात राखण्याकरिता पेरणीनंतर 10 दिवसांनी पहिली आणि 20 दिवसांनी दुसरी विरळणी करावी.तणांचा बंदोबस्त करण्यासाठी 2 वेळा कोळपणी आणि 2 वेळा खुरपणी करावी. अ‍ॅट्राझिनन तणनाशक 0.5 किलो प्रतिहेक्टर पेरणीनंतर आणि पीक उगवण्यापूर्वी 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. बाजरीवरील केसाळ अळी, खोडकिडा आणि सोसे या किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. गोसावी, अरगट आणि काजळी या रोगांचा प्रादुर्भाव जास्त होतो. अरगट रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करावी. रोगट झाडांचा नायनाट करावा. अशा प्रकारे काळजी घेतल्यास शेतकर्‍यांना पिकांचा अधिक फायदा होऊ शकेल आणि त्यांना उत्पन्‍नही चांगले मिळेल.
– सतीश जाधव

Back to top button