तिळाची शेती करताना… | पुढारी

तिळाची शेती करताना...

विद्यमान केंद्र सरकारने खाद्यतेलाची आयात कमी करण्यासाठी तेलबियांच्या शेतीला प्रोत्साहन देण्याचे धोरण स्वीकारले आहे. यामध्ये तिळाचाही समावेश होतो. वस्तुतः तिळाचे पीक घेण्यात भारत जगात अव्वल क्रमांकावर आहे. विशेषतः महाराष्ट्रात तिळाची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्याकडे तिळाचा वापर प्रामुख्याने खाद्यतेलाव्यतिरिक्‍त, मसाला, तिळगूळ, रेवडी तयार करण्यासाठी होतो. शिवाय यापासून तयार होणारी पेंड गुरांना खाऊ घालतात. तीळ हे द्विदल पीक असल्याने शेतकरी सलग पीक अथवा मिश्र पिकाच्या स्वरूपात त्याचे उत्पादन घेतात.

या पिकाची लागवड करण्यासाठी हलकी, वाळूमिश्रित, चिकन मातीची जमीन उत्तम ठरते. चांगला निचरा होणार्‍या सर्व प्रकारच्या जमिनीत तिळाचे पीक येऊ शकते. रेताड आणि खारवट जमिनीत हे पीक घेऊ नये. तीळ हे द्विदल पीक आहे. या पिकासाठी एक नांगरणी आणि उभी आडवी कुळवणी किंवा वखरणी करावी. ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. नंतर फळी फिरवून जमिनीचा पृष्ठभाग थोडा घट्ट करावा.

या पिकाच्या जातींपैकी चांदा 8 ही जात प्रभावी असते. ती 130 दिवसांत पक्‍व होते आणि उत्पादनही चांगलं देते. या जातीचे बी तपकिरी रंगाचे असते, तर फुले तीळ 1 ही जात पक्‍व होण्यास 90 ते 95 दिवस लागतात. या जातीचे सरासरी हेक्टरी 5.5 ते 6.0 क्‍विंटल उत्पादन मिळते. दाणा पांढरा शुभ्र असून पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या क्षेत्रात या वाणाची निवड करणे फायदेशीर ठरते. तापी जातीस पक्‍व होण्यास 80 ते 85 दिवस लागतात.

पेरणी करताना बियाणे तीन सेंटिमीटर खोलीवर पडेल याची काळजी घ्यावी. बियाणे जास्त खोलीवर पडल्यास उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो. एक किलो बियाणास 2 ते 3 ग्रॅम थायरम चोळावे. मिश्रपीक घेताना मुख्य पिकामध्ये तीळ मिसळून पेरावे. त्यामुळे तिळाची रोपे तुरळक उगवून चांगली पोसली जातात. उन्हाळी तिळाची पेरणी फेबु्रवारीच्या पहिल्या पंधरवड्यात करणे फायदेशीर ठरते. हे पीक घेत असताना दोन ओळीतील अंतर 30 सेंटिमीटर ठेवून दोन रोपांतील अंतर 15 सेंटिमीटर ठेवल्यास हेक्टरी झाडांची संख्या वाढून चांगले उत्पादन मिळते. तिळाचे मिश्रपीक घेतल्यास त्यास वेगळे खत देण्याची आवश्यकता भासत नाही.

अधिक उत्पादन घ्यायचे असेल, तर झाडांची हेक्टरी संख्या 2.22 लाख असणे जरुरीचे आहे. त्यासाठी बियाणे उगवणीनंतर 21 दिवसांनी दोन रोपांत 10 ते 15 सेंटिमीटर अंतर ठेवून विरळणी करावी. या पिकाची कापणी वेळेवर करणे गरजेचे आहे अन्यथा बोंडे फुटून तीळ शेतात गळून पडतात. ज्यावेळी पानांचा रंग पिवळा होऊन पाने गळू लागतात तसेच बोंडांचा, खोडांचा रंग पिवळसर होतो. तेव्हा पीक कापणीस योग्य असे समजावे. कापणी केल्यानंतर झाडांच्या पेंड्या बांधून त्या एक बांबू जमिनीत रोवून त्याच्या भोवती उभ्या रचून ठेवाव्यात. पेंड्या चांगल्या वाळल्यावर ताडपत्रीवर एक एक पेंडी उलट करून हाताने किंवा काठीने झटकावी. काडी कचरा काढून, उफणणी करून, तीळ स्वच्छ करावे. 2 ते 3 कडक उन्हात वाळवावे. साठवण करताना जर दुर्लक्ष झाले, तर किडी तीळ खातात आणि तिळाचा फक्‍त भुगा शिल्‍लक राहतो. प्रामुख्याने या तिळाचा वापर आपल्या देशात खाद्यतेल व्यतिरिक्‍त मसाला, तिळगूळ, रेवडी इत्यादीसाठी करण्यात येतो. याशिवाय तेलापासून निघालेली पेंड गुरांना खाऊ घालण्यासाठीही याचा उपयोग होतो.
– प्रसाद पाटील

Back to top button